गोमांस तस्करांनी पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:28 AM2018-11-30T01:28:05+5:302018-11-30T01:28:09+5:30
ठार मारण्याचा प्रयत्न : जुन्नर येथील घटना
जुन्नर : अवैधरीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करणाºया पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाला जुन्नर पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. या गाडीमध्ये जवळपास ६०० किलो गोमांस आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शाहीद सलीम इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. जुन्नर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे हे गुरुवारी पहाटे पोलीस कर्मचाºयांसह सरकारी वाहनाने वाहनचालक बाळशीराम भवारी व पोलीस मित्रासमवेत गस्त घालत होते. या वेळी जुन्नरमधील मध्य वस्तीतील पणसुबा पेठ येथील सौदागर मशिदीजवळ त्यांना संशयास्पदरीत्या जात असलेली एक मोटार दिसली. त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र त्या वेळी चालकाने वेगाने आपली गाडी रस्त्यावर उभे असलेले पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या अंगावर घातली. या वेळी प्रसंगावधान राखून नलावडे व त्यांचे कर्मचारी बाजूला सरकले. यामुळे त्यांचा जीव वाचला. मोटारचालकाने पोलिसांच्या गाडीला जोरात धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिताफीने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैधरीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळले.
वाहनचालक इनामदार याने दिलेल्या माहितीनुसार, नोमान कुरेशी, मजहर कुरेशी, अतिक बेपारी, नाजीम बेपारी, जिकरान कुरेशी, बाबा कुरेशी (सर्व जण रा. खलीलपुरा, जुन्नर) यांनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करून हे गोमांस वाहतुकीसाठी इनामदारकडे दिले असल्याचे समजते.
पोलीस निरीक्षक नलावडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोवंशहत्या, भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमांनुसार गुन्हा दाखल केलेला असून शाहीद इनामदार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे हे करीत आहेत.