प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:28 AM2018-06-17T00:28:19+5:302018-06-17T00:28:19+5:30
पुणे : विद्यावेतन वाढीसह विविध मागणीसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, शनिवारी नागपूर येथे वित्तमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांच्यासोबत इंटर्न डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विद्यावेतनाचा प्रश्न पूर्णपणे वैद्यकिय शिक्षण विभागाचा आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीतून वैद्यकीय विभागाने इंटर्न डॉक्टरच्या वेतन वाढ करणे अपेक्षित आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. तसेच वैद्यकीय विभागाच्या उपसचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधून
चर्चा केली.
या बैठकीत सचिव डॉ. गोकुळ राख, सहसचिव डॉ. केतन देशमुख, डॉ. शुभम बोरेकर, डॉ. सजल बंसल सह संपूर्ण महाराष्ट्रातील इंटर्न मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>तूर्तास संप सुरूच
दरम्यान, तूर्तास संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून संपाबाबतचा निर्णय बैठकीनंतर करण्यात येणार असल्याचे इंटर्न डॉक्टरांचा
प्रतिनिधी केतन देशमुख यांनी कळवले आहे.