कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ५४२ बालरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:44+5:302021-07-11T04:08:44+5:30
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग ...
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तब्बल ५४२ बालरोगतज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली असून, पहिले प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी खास ६ हजार १५६ खाटा तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेची जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्वच आरोग्य यंत्रणेकडून व तज्ज्ञ लोकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी खास लहान मुलांचा विचार करून रुग्णालयात खाटांची तयारी करण्यात आली आहे. लहान मुलांसोबत पालकांनादेखील राहण्याची सोयी करण्यात आली आहे.
यात केवळ लहान मुलांसाठी जिल्ह्यात एकूण ६ हजार १५६ खाटांची तयारी करण्यात आली आहे. यात ३ हजार ४६९ ही शासकीय रुग्णालयांत तर, २ हजार ६८७ खाटांची सोय खासगी रुग्णालयांत करण्यात आली आहे. लहान मुलांकरिता खाटा तयार करताना ऑक्सिजन आणि आयसीयूसह व्हेंटिलेटर खाटांची सोय करण्यात आली आहे.
चौकट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांच्या संसर्गाचा विचार करून राज्य आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे. यात संपूर्ण जिल्ह्यासाठी ५४२ बालरोगतज्ज्ञ तयार करण्यात आले आहे. यात पुणे महापालिका क्षेत्रात अडीचशे बालरोगतज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड हद्दीत १७२ आणि ग्रामीण भागात १२० बालरोगतज्ज्ञांची तयारी सुरू आहे.