दुरवस्थेशी लढण्याचेही ‘ट्रेनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 01:23 AM2016-06-20T01:23:50+5:302016-06-20T01:23:50+5:30

शहरातील ससून शासकीय रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी नर्सेसना अतिशय दुरवस्थेतील खोल्यांमध्ये राहावे लागत आहे

'Training' to fight disturbances | दुरवस्थेशी लढण्याचेही ‘ट्रेनिंग’

दुरवस्थेशी लढण्याचेही ‘ट्रेनिंग’

Next

पुणे : शहरातील ससून शासकीय रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी नर्सेसना अतिशय दुरवस्थेतील खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली असून अतिशय वाईट अवस्थेत राहून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागत आहे.
डॉक्टरांच्या बरोबरीने रुग्णांची सेवा करणारे नर्सेस या वैद्यकीय सेवेतील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना पुरेशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून अनेक खोल्यांची छपरे गळत आहेत. भिंतीला पोपडे आले असून त्यावरील रंग उडाला असल्याचे दिसले.
याचवेळी नर्सेसच्या वसतिगृहाच्या एकूण तीन मजल्यांपैकी एक मजला हा एमबीबीएसचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा अतिशय उत्तम पद्धतीने देण्यात आलेल्या असल्याचेही सांगण्यात आले. तळमजल्यावर नर्सिंगचे वर्ग, लॅब, आॅडिटोरिअम व शिक्षक खोली आहे, तर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आहे. तळमजला आणि दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची अवस्था अतिशय वाईट असल्याचे पाहणीत लक्षात आले. त्यामुळे शासकीय यंत्रणेमध्येच शिक्षण घेत असणाऱ्या दोन अभ्यासक्रमांसाठी असा दुजाभाव का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबरोबरच नर्सेस विद्यार्थ्यांचे वर्ग, स्वच्छतागृहे यांचीही अवस्था अतिशय वाईट असून त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचेही येथील संबंधितांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
बी. जे. मेडिकल महाविद्यालयात बॅचलर आॅफ मेडिसिन, बॅचलर आॅफ सर्जरी हे पदवीचे अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमही चालविले जातात. याबरोबरच बी. जे. मेडिकल महाविद्यालयाला संलग्नित असणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये चार वर्षाचा बॅचलर आॅफ सायन्स इन नर्सिंग हा अभ्यासक्रमही चालविला जातो. यामध्ये ५० विद्यार्थी असून मुले
आणि मुली दोघेही हा अभ्यासक्रम करीत आहेत. (प्रतिनिधी)
नर्सिंग महाविद्यालयात पुरेसे सेवकही नसल्याचे आणखी एका विद्यार्थिनीने सांगितले. संपूर्ण नर्सिंंग महाविद्यालयासाठी केवळ दोन शिपाई असून ग्रंथपालही उपलब्ध नसल्याचे तिने सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २५ संगणकांची आवश्यकता असून सध्या केवळ दोनच संगणक महाविद्यालयात आहेत. याबाबत बी. जे. मेडिकलचे अधिष्ठाता यांना विचारले असता वीज, पायाभूत सुविधाही आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, ही अतिशय खेदाची बाब आहे. आमच्या या मागण्या संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचविल्या असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र मागील अनेक वर्षांपासून त्याविषयी आजपर्यंत कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.

Web Title: 'Training' to fight disturbances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.