अग्निशामक दलाकडून कोविड केअर सेंटरमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:33+5:302021-04-19T04:10:33+5:30

पुणे : राज्यभरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनांमुळे पुणे महापालिका सतर्कता बाळगत आहे. या आगीच्या घटनांच्या ...

Training by firefighters at Covid Care Center | अग्निशामक दलाकडून कोविड केअर सेंटरमध्ये प्रशिक्षण

अग्निशामक दलाकडून कोविड केअर सेंटरमध्ये प्रशिक्षण

Next

पुणे : राज्यभरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनांमुळे पुणे महापालिका सतर्कता बाळगत आहे. या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये आपत्कालीन बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यास अग्निशामक दलाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत तेरा ठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांसाठी शहरातील वैद्यकीय व्यवस्था सुद्धा तोकडी पडू लागली आहे. त्यामुळे कोविड सेंटर वाढविण्यासोबतच खाजगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जम्बो कोरडी सेंटर, बाणेर कोविड सेंटरसह शहरातील विविध भागात सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये आजमितीस जवळपास सहा हजारापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. उन्हाचा तडाका वाढल्याने आग लागण्याचा धोका अधिक आहे.

यासोबतच या ठिकाणची वातानुकूलित यंत्रणा २४ तास सुरू असते. वैद्यकीय उपकरणे विद्युत उपकरणे सतत सुरू असतात त्यामुळे गर्मी निर्माण होऊन शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता अधिक असते.

जर दुर्दैवाने अशी एखादी दुर्घटना घडलीच तर रुग्णांच्या बचावासाठी नेमके काय करावे, आगीवर कमीत कमी वेळात नियंत्रण कसे मिळवावे याचे प्रशिक्षण अग्निशामक दलाकडून संबंधित कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही दिले जात आहे. अग्निशामक दलाकडून या कोविड केअर सेंटरची सुरक्षा संदर्भातील पाहणी केलेली आहे. सुरक्षेसंदर्भात ज्या त्रुटी आढळल्या आहेत, त्या त्रुटी दूर कराव्यात असे पत्र संबंधितांना दिलेले आहे. त्याच्या प्रती आरोग्य प्रमुख आणि भवन विभागाला सुद्धा दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी अग्निशामक दलाकडून वारंवार तपासणी केली जाते आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये आजमितीस ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी अग्निशामक दलाची एक गाडी २४ तास उभी केलेली आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि अधिकारी या दुर्घटना घडू नयेत म्हणून खबरदारी बाळगत असल्याचे रणपिसे यांनी सांगितले.

Web Title: Training by firefighters at Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.