जिल्ह्यातील वैैद्यकीय अधिकाऱ्यांना ससूनतर्फे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:50+5:302021-03-13T04:21:50+5:30
कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या आठवड्याभरात उद्रेक वाढत चालला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट समजली ...
कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या आठवड्याभरात उद्रेक वाढत चालला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट समजली जात आहे. १० ते २० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्याच उद्रेकाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यावर भर दिला जात आहे.
पुढील आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जास्तीचे मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. उद्रेक लक्षात घेऊन गेल्या महिन्याभरापासून विविध गटांमध्ये ससूनतर्फे प्रशिक्षण घेतले जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निवासी डॉक्टर, ससूनमधील इतर विभागांचे डॉक्टर यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान कसे वर्तन असावे, त्यांची काळजी कशी घ्यावी, अशी माहिती देणारे परिचारिकांचे प्रशिक्षणही पार पडले. परिचारिकांचे आणखी दोन प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण ‘केस बेस्ड’ होते. मागील वर्षभरात ज्या पध्दतीच्या कोरोना केसेस हाताळल्या गेल्या, त्यांना कसे उपचार देण्यात आले, ऐन वेळची परिस्थिती कशा पध्दतीने हाताळण्यात आली, कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घ्यावेत, असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात जवळपास १२५ वैैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ससूनमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.