Baramati: बारामतीत कोसळले शिकाऊ विमान, पायलट जखमी; विमानाचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:34 PM2023-10-19T21:34:00+5:302023-10-19T21:35:11+5:30
वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड या कंपनीचे हे विमान आहे....
- प्रशांत ननावरे
बारामती (पुणे) :बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ रेल्वेस्थानकासमोर गुरुवारी (दि. १९) सायंकाळी ४:३० च्या सुमारास शिकाऊ विमानाचाअपघात झाला. या अपघातात वैमानिक प्रशिक्षण देणारा पायलट किरकोळ जखमी झाला आहे, तर विमानाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड या कंपनीचे हे विमान आहे.
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला इर्मजन्सी लँडिंग करावे लागले. त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात असणारे पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बारामती एमआयडीसीच्या विमानतळावर अन्य एका वैमानिक प्रशिक्षण संस्थेसह रेड बर्ड फ्लाय कंपनीच्या मार्फत विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण देण्यात येते. गुरुवारी सायंकाळी हे विमान उड्डाण पूर्ण करून शेवटच्या टप्प्यात उतरण्याच्या मार्गावर होते. विमान धावपट्टीपासून अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर पोहोचले होते. याचवेळी कटफळ रेल्वेस्थानकासमाेर विमान हे उजव्या बाजूच्या एका शेतात बाभळीच्या झाडांत कोसळले. विमान कोसळत असताना विमानाचे समोरील चाक तुटून पडले. विमानाचा पुढचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला. घटनेची माहिती समजताच काही अंतरावर असलेल्या रेड बर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विमानात अडकलेले पायलट शक्ती सिंग यांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अपघाताबाबत अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोइटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, विमान अपघाताचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा पोलिस प्रशासन कारवाई करेल, असे भोइटे यांनी स्पष्ट केेले.
बारामतीतील चौथा अपघात
बारामतीत प्रशिक्षण घेत असलेल्या विमानांना यापूर्वी देखील अपघात झाले आहेत. काही वर्षांपूर्वी मेखळी (ता. बारामती) निरा नदीच्या पुला खालून प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विमान नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील निरा नदीत विमान कोसळले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१९ रोजी बाबीर रुई गावात शिकाऊ वैमानिक चालवत असलेले विमान कोसळले होते, तसेच २६ जुलै २०२२ रोजी कडबनवाडी (ता. इंदापूर) येथे शिकाऊ विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले होते. या अपघातात धाडसी वैमानिक प्रशिक्षणार्थी युवती किरकोळ जखमी झाली होती. त्यापाठोपाठ सुमारे १५ महितन्यांनी शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे. शिकाऊ विमानाचा गेल्या काही वर्षांतील चाैथा, तर रेड बर्डचा हा पहिलाच अपघात झाला आहे. रेड बर्ड ही कंपनी सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.
...तर मोठा अनर्थ घडण्याची भीती
आजचा शिकाऊ विमानाचा अपघात ४:३० च्या सुमारास कटफळ रेल्वेस्थानकासमोर घडला. रेल्वे रुळापासून काही फूट अंतरावर हे विमान कोसळले. ५ च्या सुमारास बारामती- पुणे रेल्वे येथून मार्गस्थ होते. सुदैवाने हे विमान त्या वेळेपूर्वी आणि रुळापासून दूर अंतरावर झाडात पडले.
अपघात ठिकाण आणि सुदैव
बारामती एमआयडीसी परिसरात विमान प्रशिक्षण देण्यासाठी अनुकूल हवामान आहे. त्यामुळे या ठिकाणी देशातून विद्यार्थी वैमानिक प्रशिक्षणासाठी येतात. या परिसरात हजारो कर्मचारी कार्यरत असणारे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत. सुदैवाने हे विमान या प्रकल्पापासून काही अंतरावर दूर जाऊन पडले. याची अपघातस्थळी चर्चा सुरू होती.
अपघात ग्रस्त विमान पडल्यानंतर ओळख लपविण्यासाठी तातडीने काळ्या कागदाने गुंडाळण्यात आले. अपघात ग्रस्त विमान कोणाच्या नजरेला पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली, तसेच कंपनीचे कर्मचारी, होमगार्ड यांची विमानाभोवती सुरक्षा ठेवण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळी भेट देत विमानाची पाहणी केली. अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला होता.
डीजीसीएमार्फत होणार तपासणी
विमान अपघाताची डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)मार्फत चाैकशी आणि तपासणी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विमान अपघाताची राष्ट्रीय पातळीवरील याच संस्थेमार्फत तपासणी केली जाते. हा अपघातदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुुळे या चाैकशी अहवालानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत अपघातप्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.