बोन्साय कलेचे प्रशिक्षण द्यावे : शरद पवार; पहिल्या जागतिक बोन्साय परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:19 PM2018-02-23T12:19:45+5:302018-02-23T12:23:02+5:30
बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारलेल्या पहिल्या जागतिक बोन्सायविषयक परिषदेचे व प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
पुणे : बोन्साय ही कला जपान किंवा चीनची नव्हे, तर भारताची असून ती भारतातच वाढली आणि बौद्ध धर्माच्या बरोबर तिचा भारताबाहेर प्रसार झाला. चीन व जपान या दोन देशांनी यामध्ये उत्तम यश मिळविले असून या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर पैसादेखील कमावीत आहेत. बोन्सायचे हे प्रदर्शन प्रेरणादायी असून त्याद्वारे नवकलाकारांना प्रशिक्षण मिळून त्यांचा या कलेच्या वाढीसाठी फायदा होईल, असे उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारलेल्या पहिल्या जागतिक बोन्सायविषयक परिषदेचे व प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, जपानचे कौन्सिल जनरल रायोजी नोडा, इंडोनेशियाचे बोन्साय मास्टर रुडी नाजान, इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी किशोर खरात, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कावेरीबाई काळे, गिरीधर काळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्याआधी आज सकाळच्या सत्रात शरद पवार यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांच्याकडून बोन्सायविषयी माहिती घेतली. प्रदर्शन रविवार (दि. २५) पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू राहणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, की देशाला उद्योगपूरक विकासाची गरज आहे. बोन्साय साहित्याची मागणी ही भविष्यात वाढत जाईल व भारताची लोकसंख्या पाहता बोन्साय कला शिकणे ही एक संधी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या कलेचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा वापरदेखील करता येऊ शकेल. शेतकºयांना या कलेमधून अर्थार्जनाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. साधारणत: एक दशक आधी मी जागतिक स्तरावरील बोन्सायच्या प्रदर्शनाचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बोन्साय या कलेकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल आणि बोन्साय या कलेच्या विकासाचा पुढील प्रवास वेग घेईल, असा विश्वास असल्याचे प्राजक्ता काळे यांनी व्यक्त केला. बोन्साय फक्त श्रीमंतांची कला, हे मत मला बदलायचे आहे. ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यास त्या शेताच्या बांधावरदेखील प्री बोन्साय मटेरीअलचे उत्पादन करून शकतील. बोन्सायविषयक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव जर शेतीविषक शिक्षणात करण्यात आला तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असेही काळे यांनी या वेळी नमूद केले.
या वेळी प्राजक्ता काळेलिखित ‘बोन्साय’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.