सीमेवरील परिस्थितीनुसार जवानांना प्रशिक्षण : ब्रिगेडियर गोविंद कलवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 06:30 PM2017-12-29T18:30:56+5:302017-12-29T18:43:29+5:30
जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.
पुणे : आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यात रोज जवानांना याचा सामना करावा लागत आहे, या विरोधात लढण्यासाठी त्यांना आधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे, बेळगाव येथे हे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांबरोवर सीमेवरील भोगोलिक परिस्तितीतीचा विचार करून त्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे, बेळगाव जवळील रोहिडेश्वर या ठिकाणी ते उभारण्यात आले असून जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.
मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांना देण्यात येणारे प्रशिक्षणादरम्यान आयोजित प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना कलवड बोलत होते.
ब्रिगेडियर कलवड पुढे म्हणाले, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतात दहशतवाद, बंडखोरी, घुसखोरी कारवाया सोबतच नक्षलवादी कारवायांना लष्कराला सामोेरे जावे लागत आहे. सीमावर्ती भागातील परिस्थितीचा विचार करून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणासोबतच अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यादृष्टीने जवळील रोहिडेश्वर येथे प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
बदलत्या युद्धभूमीचा विचार करून पारंपरिक प्रशिक्षणाबरोबर नव्या तंत्राचा वापर करून त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. मराठा लाईट इन्फन्ट्रीमधील जवानांबरोबर राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती होणाऱ्या जवानांना तसेच मित्र देशातील सैनिकांनाही या ठिकाणी ३४ आठवड्यांचे अवघड प्रशिक्षण दिले जात आहे. जवानांना शारीरिक, मानसिक व शस्त्रास्त्र चालविण्यास निपुण करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी रेजिमेंट मध्ये पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यात आला आहे. त्यात वेळोवेळी अद्ययावत सुधारणा केल्या जात आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत कलवड म्हणाले, की सायबर सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साईट्समुळे ही समस्या आणखी जटिल होत आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याच्या वापरावर बंधने नाही आणता येऊ शकत. येथील जवानांना सायबर सुरक्षेबाबत जागृत केले जात आहे. जवानांना मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साईट्सचा नेमका वापर कसा करावा आणि कशापद्धतीने सुरक्षितरित्या केला जावा याबाबतची माहिती दिली जात आहे. बहुतांशी जवान हे ग्रामीण भागातून प्रशिक्षणासाठी येत असून त्यांना संपूर्णपणे मोबाईल बंदी करता येणे शक्य नाही.
दशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक
दहशतवादाविरोधात कशापद्धतीने कारवाई केली जाते, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. डोंगरी भागांत घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे जवानांची एक तुकडी खाली उतरते. लष्करी डावपेच आखत समन्वय साधत या दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला. खरोखर वाटणाऱ्या या कारवाई मुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आणला.
मराठा रेजिमेंटला २५० वर्ष पूर्ण
मराठा रेजिमेंटला २०१८ मध्ये २५० वर्ष पूर्ण होत आहेत. हे वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवृत्त अधिकारी आणि जवनासाठी पेन्शन अदालत, माजी सैनिक मेळावा, शहीद जवांनाच्या कुटुंबीयांचा सन्मान असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.