मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडवल्या
By admin | Published: June 2, 2017 01:46 AM2017-06-02T01:46:05+5:302017-06-02T01:46:05+5:30
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ठिकठिकाणी आंदोलने होऊन पुणे आणि मुंबईकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ठिकठिकाणी आंदोलने होऊन पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या अडवून कांदा, मेथी, टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला़ बाजार समितीमधील सर्व व्यवहार आज ठप्प होते़ सर्वत्र शुकशुकाट दिसून आला़ दरम्यान ओतूर येथे रात्री मोठ्या प्रमाणात तरकारीची खरेदी-विक्री झाली़ रात्री १२ पासूनच गाड्या बंद केल्याने १० ट्रक तरकारी ओतूर येथे पडून आहेत़ पुढे गेलेल्या गाड्यांनासुद्धा अडविण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी तरकारी पुढे पाठविली नाही़ ओतूर मार्केटमध्ये काकडी, फ्लॉवर व इतर तरकारी मोठ्या प्रमाणात पडून आहेत़ शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे अदा झालेले असून पडून राहिलेल्या मालाचे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहे़
जुन्नर येथे शेतकऱ्यांनी प्रभातफेरी काढून संपाला पांठिबा व्यक्त केला़ किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी १०० टक्केप्रतिसाद दिला. जुन्नर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केट आज पूर्णपणे बंद होते़ आळेफाटा येथे शेतकरी आंदोलकांनी गाड्या अडवून भाजीपाला असलेल्या गाड्यांमधील कांदे रस्त्यावर फेकून दिले. कल्याण किंवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना अटकाव केला़ दिवसभर शेतकऱ्यांनी आंदोलने केली़ तसेच शेतकऱ्यांची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागविला आहे़ ओतूर येथील आठवडे बाजार आज बंद राहिला. फळ विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविला़ मुंबईकडे जाणाऱ्या दुधाचे टँकरला पुढे जाण्यास मज्जाव केला़
नारायणगाव मार्केट बंद
नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट १०० टक्के बंद ठेवण्यात आले़ दररोज असणारा भाजीपाला, तरकारी मार्केट, टोमॅटो मार्केट पूर्णपणे बंद आहेत़ एकाही व्यापाऱ्याचे दुकान सुरू नव्हते़ खते-औषधे व्यवसायिकांनी देखील शेतकरी संपाला पाठिंबा देऊन आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले़ दररोज वर्दळ असणाऱ्या मार्केटमध्ये आज शुकशुकाट दिसून आला़ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अडवून त्यामध्ये असणारे कांदे रस्त्यावर फेकून देऊन शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले़ अनेक तरकारी घेऊन जाणाऱ्या ट्रकची हवा सोडून देऊन पुढे जाणाऱ्या वाहनांना रोखले़ नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटदेखील १०० टक्केबंद ठेवण्यात आले़
आणे
परिसरातील शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा देत सर्व प्रकारचा शेतीमाल व दूधविक्री बंद ठेवली आहे़
जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी व पेमदरा येथील सर्व शेतकरी स्वयंस्फूर्तीने संपात सहभागी झाले़ श्रीरंगदास स्वामीमहाराज मंदिरासमोर एकत्र आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत संपूर्ण गावात फेरी मारली़ त्यानंतर शहीद जयराम लक्ष्मण दाते चौकात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले़ या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून सरकारी धोरणांविरुद्ध निषेध नोंदवत आपल्या मागण्या मान्य होईपर्र्यंत संपातून माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून दिले़ प्रशांत दाते, ज्ञानेश्वर संभेराव, प्रदीप आहेर, विजय संभेराव, बाळू दाते, संजय आहेर, बाबाजी शिंदे, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले.
पिंपळवंडी
पिंपळवंडी परिसरात शेतकऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. हा बंद शांततेत पाळला. आठवडे बाजार होता, परंतु बंद ठेवण्यात आला होता.
पिंपळवंडी, कांदळी, वडगाव कांदळी, काळवाडी, बोरी, साळवाडी, भोरवाडी, येडगाव या परिसरामधील शेतकरी संपात सहभागी झाले होते. शेतातील काढलेला तरकारी व भाजीपाला बाजारात न घेऊन जाता, शेताच्या बांधावर व रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध केला. येथील तरुणांनी कुकडी डाव्या कालव्यावरून जात असलेली दुधाची गाडी अडवून त्यामधील दूध रस्त्यावर ओतून दिले, तर चाळकवाडी टोलनाक्याजवळ रस्त्यावर मिरची टाकून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी पिंपळवंडी गावचा आठवडे बाजार होता. हा बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे गावात शुकशुकाट होता.
बेल्हा
बेल्हा व पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे दूध ओतून; तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध घेऊन जाणारी वाहने तपासण्यात आली; तसेच परिसरातील दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले होते. पारगाव तर्फे आळे येथील सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच दूध बंद केले आहे.
आळेफाटा
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरीवर्गही मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. आळेफाटा चौकात शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून शेतमाल रस्त्यावर टाकला.
सकाळीच आळेफाटा चौकात शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले. दूध वाहतूक टेम्पो तसेच कांदा व टोमॅटो घेऊन जाणारे ट्रक त्यांनी अडविले व काही शेतमाल रस्त्यावर टाकला. कर्जमाफी झालीच पाहिजे शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांच्यामधून व्यक्त होत होत्या. आळेफाटा पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत शेतकरीवर्गाला शांत केले. दरम्यान, आळेफाटा येथील गुरुवारच्या संकरित गाईंच्या बाजारात गाई विक्रीस न आणत निषेध केला. या बाजारात शुकशुकाट होता, तर आळेफाटा येथील भाजीपाला बाजारातही बंद पाळण्यात आला.