Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 01:31 PM2021-11-22T13:31:52+5:302021-11-22T13:32:05+5:30
प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे
पुणे : रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित केल्या. त्यामुळे कोरोनाकाळात वाढलेले तिकीट दर ३० टक्क्यांनी कमी होऊन पूर्वी इतके झाले. मात्र अजूनही प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे. प्रवासी आता सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेल्वे प्रशासन जवळपास ५४ घटकांना तिकीट दरात सवलत देते. कोव्हीडपूर्वी ही सवलत दिली जात होती. सवलतीचा सर्वात जास्त फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळतो. मात्र जेव्हा रेल्वेने सर्वच गाड्यांना शून्य क्रमांक देऊन विशेष गाड्यांचा दर्जा दिला. तेव्हा त्या सवलती रद्द झाल्या. आता पुण्यातून सुटणाऱ्या व व्हाया जाणाऱ्या बहुतांश गाड्या पूर्वीप्रमाणे नियमित झाल्या आहेत. मात्र अजूनही त्या गाड्यांतील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे तिकिटात सवलत दिली जात नाही. तेव्हा सवलती पूर्वीप्रमाणे देण्यात याव्या, अशी मागणी आता प्रवासीवर्गातून होत आहे.
''प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जाईल. यात विभागाची कोणतीही भूमिका नाही. जेव्हा बोर्डाकडून निर्णय घेतला जाईल त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असे पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.''
''रेल्वे प्रशासनाने गाड्या नियमित करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. मात्र त्यामध्ये अजूनही सवलती दिल्या जात नाही. त्या तात्काळ प्रवाशांना मिळायला हव्यात. शिवाय अन्य गाड्यादेखील आता नियमित करणे गरजेचे आहे असे पुणे रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितले.''