बारामतीत उद्यापासुन व्यवहार होणार पूर्ववत, व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:04 PM2020-05-21T19:04:09+5:302020-05-21T19:09:25+5:30
सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार
बारामती : अखेर ५५ दिवसानंतर बारामतीची बाजारपेठ फुलणार आहे. शहरात शुक्रवार (दि. २२) पासून दररोज व्यवहार सुरू होणार आहेत.त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र,यातुन आता मात्र हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसना वगळण्यात आले आहे.
पुणे शहराच्या धर्तीवर रोटेशन पध्दतीने दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने ११ मे पासुन परवानगी दिली होती.त्यानुसार विविध दुकानांना वार ठरवुन देण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासुन बाजारपेठ याच तत्वावर सुरु होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीसह जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली .नुकताच कापड आणि स्वीट होम दुकाने उघडण्याचे दिवसामध्ये मंगळवार(दि.१९) पासुन बदल करण्यात आला होता.आता मात्र हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आदी वगळता इतर सर्व दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑटोमोबाईल , संगणक, ई लेक्ट्रॉनिक , रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉप, फोटो स्टुडिओ, , बॅटरि, खेळणी , फुले व पुष्पहार , भांडी , टेलरिंग , सोने दुकाने, रस्सी पत्रावळी , फूट वेअर, ज्वेलरी , घड्याळ , सूटकेस बॅग ,जनरल स्टोअर , सायकल , टायर , पंक्चर , स्टील ट्रेडर, स्क्रप , हार्डवेअर , बिल्डिंग मटेरियल , पेंट , कार वॉशिंग , डिजिटल प्रेस प्रिंटिंग, झेरॉक्स , मातीची भांडी दुकाने , टोपल्या आदी दुकाने सुरू ठेवण्यासाठी
यापुर्वी वार ठरविण्यात आले होते. आता मात्र, सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार आहेत. प्रशासन भवन येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.यावेळी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, रमणिक मोता,सुभाष सोमाणी,स्वप्नील मुथा,शैलेश साळुंके आदी उपस्थित होते.
याबाबत ' लोकमत'शी बोलताना महासंघाचे अध्यक्ष गुजराथी यांनी सांगितले, राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत.त्यानुसार सर्वत्र हा नियम लागु होणार आहे.सकाळी ९ ते ५ या वेळेत काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.त्यानुसार सर्व व्यापारी वर्ग शासनाच्या नियमांचे पालन करणार आहे. २२ ते ३१ मे पर्यंत या पध्दतीने दुकाने सुरु राहणार आहेत. ३१ मे रोजी राज्य शासन सुधारीत आदेश देणार आहेत.त्यानंतर दुकाने सुरु ठेवण्याबाबतचे वेगळे नियोजन ठरणार आहे .
दरम्यान, एका वेळी ५ ते १०ग्राहकांना दुकानात सोडण्यात येणार आहे , दुकानप्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग सुविधा असणे आवश्यक आहे.याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर , दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत. नवीन निर्णयाप्रमाणे सर्व अस्थापना दैनंदिन सुरू होणार आहे.