पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली; रविंद्र बिनवडे नवे अतिरिक्त आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:04 PM2021-07-13T22:04:09+5:302021-07-13T22:04:46+5:30
अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती.
पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची मंगळवारी एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर काम करीत असताना त्यांच्याकडे, पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार ही काही काळ होता.
मार्च, २०२० मध्ये कोरोना आपत्तीने शहरात मोठा कहर सुरू केला. यावेळी त्यांच्याकडे महापालिकेचा आरोग्य विभागाची धुरा असल्याने, त्यांनी कोरोना आपत्ती निवारणासाठी विविध यशस्वी कामगिरी पार पाडली. जम्बो हॉस्पिटल उभारणी, महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे, कोविड सेंटर उभारणे, अधिकाधिक तपासणी करणे, खाजगी हॉस्पीटलमधील खाटा ताब्यात घेणे. याचबरोबर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याबरोबरच त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल उभारणी करण्याचे कामही केले. तसेच अधिकाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
------