ललित पाटील प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणाकडे दया; अन्यथा त्याचा एन्काउंटर करतील - रवींद्र धंगेकर
By राजू हिंगे | Published: October 23, 2023 08:03 PM2023-10-23T20:03:34+5:302023-10-23T20:04:11+5:30
ससूनचे डीन मूग गिळून का गप्प? त्यांचा फोन तपासा
पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाची सखोल आणि निपक्षपाती चौकशी करण्यासाठी हा तपास केद्रीय यंत्रणाकडे देण्यात यावा. अन्यथा पोलिस बनावट चकमकीत ललित पाटील याचा एन्काउंटर करतील अशी भिती कॉग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. ससुन रूग्णालयातील एक शिपाई हा माफिया ललित पाटील आणि संबंधित मंत्री यांच्यातील दुवा होता. त्यामुळे त्याची चौकशी होणे आवश्यक आहे अशी मागणीही त्यांनी केली.
ड्रग्ज माफियाललित पाटील याला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेले जात होते. ससुन रूग्णालयातुन त्याची ड्रग तस्करी सुरू होती. पोलिस आयुक्त यांच्याकडे या संबंधीचे व्हिडीओ पोहोचवण्यात आले आहेत. पाेलिस ललित पाटील यांच्या सोबत होते. त्याला खोटा तपास दाखवुन ताब्यात घेतले बेले आहे. त्यामुळे याबाबतचा केद्रीय तपास यंत्रणाकडुन पुढील तपास केला जावा अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.
या प्रकरणात सरकारमधील तीन मंत्र्यावर संशयाची सुई आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे. हेतु परस्पर तपासाची दिशा बदलण्यात येत आहे. राज्यातील मंत्री या प्रकरणात असल्यामुळे ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा एन्काउंटर करून तपासाची दिशा बदलली जाउ शकते अशी माझ्या मनात शंका आहे असेही धंगेकर यांनी सांगितले.
ससुनचे डीनचा फोन तपासा
ड्रग्ज माफिया ललित पाटील ससुन रूग्णालयातुन पळून गेला. त्यानंतर तो बंगळुरूमध्ये आढळला. या प्रकरणात ससुनचे डीन डॉ. संजीव ठाकुर मुग गिळुन गप्प आहेत. त्यामुळे त्यांना सहआरोपी करून त्यांच्या फोनची तपासणी करावी अशी मागणी कॉग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे.