पुणे विभागातील ३२ तहसीलदारांची बदली; अनेक तहसीलदार थेट विदर्भात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:16 PM2023-04-15T13:16:49+5:302023-04-15T13:18:33+5:30
पुण्यातील अनेक तहसीलदार थेट विदर्भात...
पुणे : राज्य शासनाने पुणे विभागातील ३२ तहसीलदारांची बदली केली. यात मुळशीच्या तहसीलदारपदी रणजित भोसले, पिंपरी चिंचवडच्या तहसीलदारपदी अर्चना निकम, तर बारामतीच्या तहसीलदारपदी गणेश शिंदे यांची नियुक्ती केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांपाठाेपाठ तहसीलदारांच्या बदल्यांना वेग आला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची बदली करण्यात येत आहे. काेरोनाचे संकट, राजकीय फेरबदल आदी कारणांमुळे गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी बदल्यांना स्थगिती दिली हाेती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या.
नवीन बदल्यांनुसार वेल्हा तहसीलदारपदी दिनेश पारगे, पुणे नागरी समूह तहसीलदारपदी सुनीता आसवले, विभागीय आयुक्त कार्यालय सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारपदी मनीषा कुलकर्णी, शेती महामंडळ येथे रूपाली रेडेकर, जिल्हा पुनर्वसन शाखेत तहसीलदारपदी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे.
पुण्यातील अनेक तहसीलदार थेट विदर्भात :
शासनाने यंदा बदली करताना पुण्यातील अनेक मातब्बर तहसीलदारांना थेट गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांत पाठविले आहे. यात मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली धानोरा तहसीलदार (जि. गडचिरोली), येथे तर मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांना शिरूर कासार (जि. बीड), आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची बदली अमरावती जिल्ह्यात, तर बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात केली. वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांची रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात, बालाजी सोमवंशी यांची बदली नागपूर जिल्ह्यात केली आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत.