बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण
By नारायण बडगुजर | Updated: November 22, 2023 16:40 IST2023-11-22T16:39:57+5:302023-11-22T16:40:15+5:30
संशयितांनी या जमिनीतील २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले

बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण
पिंपरी : वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बनावट पात्रांच्या आधारे २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन हस्तांतर करत शासनाची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक मावळ २ येथे हा प्रकार उघडकीस आला. १६ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
रफिक दाऊद रुवाला (७३), आली अजगर (२०), एक महिला (सर्व रा. नेरूळ रोड, ठाणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आंबवणे येथील वनपाल संजय आहिरराव यांनी मंगळवारी (दि. २१) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत काही क्षेत्र खासगी वन संपादन अधिनियम १९७५ अंतर्गत येते. त्या जमिनीची विक्री करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. संशयितांनी या जमिनीतील २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले. त्या पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक मावळ २, तळेगाव दाभाडे येथे तीन वेगवेगळे दस्त करून २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन हस्तांतरित केली. बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हस्तांतर केल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक संदीप इंगळे तपास करीत आहेत.