Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:00 PM2022-12-15T15:00:03+5:302022-12-15T15:03:04+5:30

सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु, गुन्ह्यांचे प्रमाणच इतके वाढले की, त्यात आणखी काही करायचे राहून गेले.

Transfer of Police Commissioner Amitabh Gupta Pune citizens love will always be remembered... | Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली

Amitabh Gupta:"पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील..." पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली

Next

पुणे: पुण्यात काम करताना संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवतानाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु, गुन्ह्यांचे प्रमाणच इतके वाढले की, त्यात आणखी काही करायचे राहून गेले. वाहतूक सुधारणेसाठी खूप काही करायचे होते, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त गुप्ता यांची मंगळवारी रात्री राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली. त्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गुप्ता म्हणाले की, पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहील. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. या सोहळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही. शहराचा वाढता विस्तार, वाहतुकीचा वाढता ताण, शहराची रचना अशा अनेक बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी मोक्का, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.

सायबरमधील ८० टक्के गुन्हे हे दाखलपात्र असतात; परंतु, त्याचा प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल होण्यास वेळ लागतो. प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर कक्ष स्थापन करून तातडीने गुन्हे दाखल होतील, यासाठी प्रयत्न केला. गेल्या २ वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये इतकी वाढ झाली आहे की, इतर गुन्हे १० हजार असतील तर केवळ सायबर गुन्हे २० हजारांपेक्षा अधिक आहेत. त्यात आणखी बरेच काही करायचे होते, असेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर सक्रिय असल्याबाबत ते म्हणाले की, आपली कोणाला मदत लागते का, कोणाचे काम अडले आहे का, हे समजावे, यासाठी आपण सोशल मीडियावर सक्रिय असतो. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर त्याला कमीतकमी वेळेत पोलिसांकडून प्रतिसाद मिळेल, यासाठी आपण दक्ष असतो. त्यासाठी सोशल मीडियाचा खूप उपयोग होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

गैरव्यवहाराचा सखोल तपास केल्याचे समाधान

आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्न पत्रिका फुटीप्रकरण, लष्करी भरती प्रश्न पत्रिका फुटीप्रकरण, तसेच आभासी चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. राजकीय दबाब किंवा हस्तक्षेप झाला नाही. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली, असे गुप्ता यांनी नमूद केले.

पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची गरज

पुणे शहराचा विस्तार पाहता मनुष्यबळ अपुरे आहे. पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची निर्मिती व्हायला हवी, असेही गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Transfer of Police Commissioner Amitabh Gupta Pune citizens love will always be remembered...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.