पुणे महापालिकेत आयुक्तांचा धमाका : विभागप्रमुखांच्या केल्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:38 PM2018-08-31T22:38:58+5:302018-08-31T22:45:44+5:30
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
पुणे : महापालिका आयुक्त सौरव राव यांनी महापालिकेच्या विभागप्रमुखांच्याही बदल्या केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. शुक्रवारी कार्यमुक्त होऊन लगेचच दुसऱ्या ठिकाणचा कार्यभार घेण्यास त्यांना बदलीच्या आदेशातच बजावण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जगताप यांना आता उपायुक्त परीमंडळ क्रमांक ४ हे पद देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर व परिमंडळ क्रमांक ४ चा कार्यभार होता. स्थानिक संस्था कर कायम ठेवून परिमंडळ क्रमांक ४ हून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तुषार दौंडकर यांच्याकडील आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त कार्यभार विजय दहिभाते यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे परिमंडळ क्रमांक १ चा उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. तो सांभाळून त्यांनी या पदाचा कार्यभार पहायचा आहे. त्यांच्याकडे पुर्वीही हा विभाग होता.
दौंडकर यांच्याकडेच क्रिडा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. तो उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनीही आपल्या मुळ पदाचा कार्यभार सांभाळून हा नवा कार्यभार पहायचा आहे. स्थापत्य विभागातील अधिक्षक अभियंता मदन आढारी यांच्याकडील प्रकल्प क्रमांक २ चा कार्यभार बदलून त्यांना मलनिसारण विभागाची देखभाल दुरस्ती सोपवण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले हेमंत देवधर यांना पाणी पुरवठा विभागात बदलण्यात आले आहे. पाणी पुरवठा विभागातील जगदीश खानोरे यांना तिथून बदलून प्रकल्प क्रमांक २ ची जबाबदारी देण्यात आली आहे.
काही विभागप्रमुखांबाबत पदाधिकाची तक्रार होती. कामांना विलंब लावणे, पदाधिकाऱ्याचे सांगणे टाळणे यामुळे त्यांच्याबाबत पदाधिकाऱ्यामध्ये नाराजी होती. बदल्यांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. राव यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच विभागप्रमुखांसह कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सर्वांना नव्या पदावर त्वरीत रूजू होण्याचा आदेश देण्यात आला असून राजकीय दबाव किंवा अन्य मार्गाने बदली टाळण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबीही देण्यात आली आहे.