आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर, वालचंदनगर कंपनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:31 AM2017-12-02T02:31:31+5:302017-12-02T02:31:38+5:30
वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले.
वालचंदनगर : वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. या कंपनीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशउभारणी व देशप्रगतीच्या कामामध्ये मोलाचा सहभाग आहे. २०११ पासून आकाश मिसाईलच्या सेक्शनच्या निर्मितीस वालचंदनगर कंपनीमध्ये सुरुवात झाली. कंपनीमध्ये ३१ वर्षे मिसाईलच्या सेक्शनवर संशोधन सुरू होते. कंपनीने नुकतेच ६०० व्या मिसाईल सेक्शनची यशस्वी निर्मिती केली आहे. भास्कर यांनी काल (गुरुवारी) कंपनीला भेट दिली.
भास्कर यांनी सांगितले, की आपला भारत देश मिसाईल क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होत आहे. लवकरच जगातील इतर देशांना भारत मिसाईल निर्यात करू शकेल. आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी मिसाईलनिर्मिती केली जात आहे. मिसाईलनिर्मिती करीत असताना क्वालिटीला फार महत्त्व आहे. मिसाईलच्या निर्मितीमध्ये झालेल्या छोट्याशा चुकीमुळेसुद्धा मिसाईल झेप घेऊ शकत नाही. वालचंदनगर कंपनी तयार करीत असलेल्या मिसाईलच्या मोटर्स या मिसाईलच्या हात म्हणून कार्य करीत असतात. मिसाईलचे योग्य लक्ष गाठण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीतील कर्मचारी मिसाईलचे दर्जेदार सेक्शन तयार करीत असून देशाला मिसाईल क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करण्यामध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे.
आज महिन्याला २० मिसाईल सेक्शन तयार होत असून यामध्ये वाढ करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
या वेळी भास्कर व पिल्लई यांच्या हस्ते ६०० व्या मिसाईलचे सेक्शनच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या वेळी आकाशामध्ये फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
या वेळी वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी सांगितले, की वालचंदनगर कंपनीने आजपर्यंत ६०० यशस्वी आकाश मिसाईलनिर्मितीसाठी मोलाची मदत केली. यापुढे कंपनीने मिसाईलनिर्मिती क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचे नियोजन केले आहे. सहा वर्षांपूर्वी महिन्यामध्ये एखादे-दुसरे मिसाईलचे सेक्शन तयार होत होते.