Pune Crime: खोट्या सह्या करून तब्बल दीड कोटी केले स्वतःच्या बँक खात्यात ट्रान्सफर
By भाग्यश्री गिलडा | Published: September 21, 2023 06:45 PM2023-09-21T18:45:48+5:302023-09-21T18:46:48+5:30
नातेवाईकाची खोटी सही करून स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतल्याचा प्रकार समोर...
पुणे : एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या वंध्यत्वाचा फायदा घेऊन तिच्यावर दबाव आणून बजाज युनिव्हर्स कंपनीचे एकूण ३ हजार ६०० शेअर्स त्यांच्या संमतीशिवाय महिलेच्या नातेवाईकाची खोटी सही करून स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २०१७ ते आद्यपापर्यंत घडला आहे. याप्रकरणी सायरस बी. श्रॉफ (वय - ६२, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तक्रारदार श्रॉफ यांच्या मावशी अर्नी दिनशा शेठ (मयत) या नाना पेठ परिसरात राहत होत्या. या कालावधीमध्ये त्यांच्याकडे आरोपी अजय भडकवाड (वय -३० ,रा. सुखसागरनगर) हा चालक म्हणून नोकरी करत होता.
आरोपीने शेठ यांच्या वंधत्वाचा फायदा घेऊन त्यांच्यावर दबाव आणला. तक्रारदार व अर्नी शेठ यांच्या नावावर जनता सहकारी बँक लिमिटेड येथे डिमॅट अकाउंट होते. त्यातून बजाज फिनिवहरस कंपनीचे एकूण १ कोटी ६४ लाख किंमतीचे ३ हजार ६०० शेअर्स त्यांच्या संमतीशिवाय तक्रारदार यांची खोटी सही करून परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. तसेच अर्नी शेठ यांच्या निधनानंतर त्यांचा लॅपटॉप, मोबाईल, त्यांचे सोन्याचे दागिने व इतर वस्तू तक्रारदार यांच्या संमतीशिवाय परस्पर घेऊन गेला. याप्रकरणी अजय भडकवाड याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक एम त्रंबके पुढील तपास करत आहे.