राज्य शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांवर संक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:05 PM2020-01-16T13:05:22+5:302020-01-16T13:06:25+5:30
पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या नियुक्त्या केल्या रद्द
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुण्यासह सर्व विभागीय मंडळावरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यात पुणे विभागीय शिक्षण मंडळावर नियुक्त केलेल्या सहा सदस्यांचा समावेश आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे १३ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे विभागीय शिक्षण मंडळासह राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांवरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली होती. मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व शिक्षक, माध्यमिक शाळा शिक्षक, माध्यमिक व्यवस्थापन समिती आणि कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती या संवर्गावर केलेल्या नियुक्त्यांवर राज्यातील सरकार बदलल्यानंतर संक्रांत आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापक संवर्गात पुण्यातील रमणबाग हायस्कूलच्या तिलोत्तमा रेड्डी, खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयाच्या विलास कोंढरे यांची तर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संवर्गात एस. व्ही. एस. ज्युनिअर कॉलेजच्या शैलजा जाधव-पॉल आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील शरदचंद्र बोटेकर यांची नियुक्ती झाली होती. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संवर्गात पेरूगेट एमईएस बॉईज हायस्कूलचे अनिल म्हस्के, सेवासदन हायस्कूलच्या मनीषा पाठक, दौंड तालुक्यातील खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे रमेश दुधाट यांची यांची आणि व्यवस्थापन समिती संवर्गात विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र निरगुडे आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष नारायण पाटील यांची अशासकीय सदस्य १३ सप्टेंबर २०१९ रोजी अध्यादेश प्रसिद्ध करून नियुक्ती केली होती. मात्र, या सर्व सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि व्यवस्थापन समिती या संवर्गावर पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्याही नियुक्त्या केल्या होत्या. या सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले आहे.