बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 15, 2024 20:16 IST2024-01-15T20:16:36+5:302024-01-15T20:16:51+5:30
आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले

बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन
पुणे: पीएमपीएमएलच्या सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे यासाठी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. १५) स्वारगेट येथील महामंडळाच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन भानगिरे यांना दिले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी याबाबतचे परिपत्रक काढले. परिवहन महामंळाकडील सर्व बदली कर्मचाऱ्यांना शेड्यूल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार महामंडळातील ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड मागवण्यात आले आहेत. या हजेरी डिफॉल्ट किंवा रेकॉर्डबाबतची छाननी व तपासणी करून १५ फेब्रुवारीपर्यंत पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यानंतर शिवसेनेच्या वतीने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. आता पुणे परिवहन महामंडळातील कामगारांच्या कायम तत्त्वावर रुजू होण्याबाबतचा प्रश्न कायमचा मिटला आहे असे भानगिरे यांनी सांगितले.