Pune: अखेर पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या; निवडणूक आयोगाचा बडगा, ४१४ अधिकारी बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:17 AM2024-02-27T10:17:11+5:302024-02-27T10:36:03+5:30
ज्या पोलिस अधिकाऱ्यांची ३ वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात सेवा झाली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते....
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा बडगा दाखविल्याने साेमवार (दि. २६) अखेर राज्यातील प्रमुख पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा तब्बल ४१४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील ४१ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि ७० उपनिरीक्षक अशा १३१ आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील १३ पोलिस निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक आणि ३९ उपनिरीक्षक अशा ६४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
ज्या पोलिस अधिकाऱ्यांची ३ वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात सेवा झाली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती पोलिस आयुक्तालयाने अशा पोलिस अधिकाऱ्यांच्या त्यात आयुक्तालयात साइड पोस्टिंग दिली होती.
काही अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर केल्या होत्या. आम्ही साइड पोस्टिंगला आहोत, आमचा निवडणुकीशी थेट संबंध येणार नाही, असे असताना बदल्या केल्या असे म्हणत काही अधिकारी मॅटमध्ये गेले होते. मॅटने निवडणूक आयोगाला याबाबत विचारणा केल्यावर आपल्या निर्देशानुसार बदल्या केल्या नसल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. त्यानंतर आयोगाने फटकारल्यानंतर आता या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांना काही दिवसात दोनदा बदलीला सामोरे जावे लागले आहे.