ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:05 PM2024-02-27T15:05:54+5:302024-02-27T15:06:52+5:30
आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी
बारामती : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच निवडणूक आयोगाच्या संदर्भ देऊन बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र सदर अधिकारी प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेत आहेत का, याची खात्री केलेली नाही. बहुतांशी अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी ३ वर्षे कालावधी सदर ठिकाणी पूर्ण झालेला नाही. निवडणूक कर्तव्यात नियुक्ती झालेली नाही. काही अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी फक्त काही महिने सेवा पूर्ण केली आहे. असे असतानाही बदली करण्यात आली आहे. याबाबत बारामतीचे वकील अॅड तुषार झेंडे पाटील यांनी थेट निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकाराची चाैकशी सुरु करण्यात आली आहे.
अॅड झेंडे पाटील यांनी ‘मेल’द्वारे तक्रार केली आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचे अर्थ काढून नव्हे तर लावून पद व अधिकाराचा दुरोपयोग करून स्वतःचा व इतरांचा फायद करून दिला आहे का? अशी शंका येतेच. कृपया याची गांभीर्याने दखल घ्यावी. सर्व बदल्या तात्काळ रद्द करुन सखोल चौकशी विशेष पथका मार्फत करावी,अशी मागणी केली आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव असणारा अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिका-यांवर मेहर नजर दाखवली आहे. महाराष्ट्र विकास सेवा गट अ-ब मधील स्वजिल्ह्यातील अधिका-यांच्या बदल्या का केल्या नाहीत, असा सवाल अॅड झेंडे यांनी उपस्थित केला आहे. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ सर्व बदल्या रद्द कराव्यात, या कार्यासनातील सर्व संबंधितांना तात्काळ सदर हटविण्यात येऊन सखोल चौकशी करावी. जे अधिकारी स्वजिल्ह्यात आहेत, तर काही अधिकारी तीन वर्षे कालावधी पूर्ण केला आहे. अशा बदल्या राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आयोगाच्या नियंत्रणाखाली ठेवून संबंधित सर्वांना समुपदेशनाचे पदस्थापना देण्यात यावी. मतदारांवर प्रभाव पाडता येणार नाही. यामुळे आयोगा विषयी सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहचू शकतो. आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी. यामुळे भविष्यात निवडणूक प्रक्रियेचा फायदा घेऊन बदल्यांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचा पायंडा पाडला जाईल. याची सहानुभूती पूर्वक नोंद घ्यावी, अशी मागणी वकीलांनी केली आहे.
याबाबत अॅड तुषार झेंडे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, या तक्रारीची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत चाैकशी सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी उपलब्ध पुरावे देखील देण्याची सुचना आयोगाने केल्याचे अॅड झेेेंडे पाटील म्हणाले.