‘बालगंधर्व’चा वर्षभरात कायापालट
By Admin | Published: June 27, 2017 07:57 AM2017-06-27T07:57:51+5:302017-06-27T07:57:51+5:30
पुलंच्या पुढाकाराने आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे ५० वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. अनेक कलाकारांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुलंच्या पुढाकाराने आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे ५० वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. अनेक कलाकारांनी या रंगमंचावर कारकीर्द घडवली आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. रंगमंदिराने अनेक कलाकारांना जन्म दिला. चोखंदळ पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यावर नाटकांना जागतिक उंची प्राप्त झाली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेतर्फे कलाकारांच्या खोल्या, कलादालन, ध्वनिव्यवस्था, बैठकव्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधांच्या माध्यमातून पुढील वर्षभरात रंगमदिराचा कायापालट केला जाणार आहे. या सुविधांच्या माध्यमातून रंगमंदिर कलाकार आणि प्रेक्षकाभिमुख करण्यावर भर दिला जाईल,’ अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी आणि व्यवस्थापक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे उपस्थित होते. या वेळी टिळक बोलत होत्या. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खाँ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर तसेच आदित्य माळवे, ज्योत्स्ना एकबोटे, छाया मारणे, अजय खेडकर आदी नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी यश रुईकर (पुरुषोत्तम करंडक विजेता), विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), अस्मिता चिंचाळकर (अभिनय आणि गायन) आदी संगीत आणि गद्य मराठी रंगभूमीची सेवा केलेल्या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
माधव वझे यांनी रंगभूमीवरील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मनोहर कुलकर्णी आणि नाना रायरीकर ही राम-लक्ष्मणाची जोडी होती. या जोडीने अनेक संस्थांच्या नाट्यव्यवस्थापनाची धुरा सांभाळली. मनोरंजन नाट्यसंस्था हा मराठी रंगभूमीचा नारायण होता. अण्णांनी सर्व जीवन रंगभूमीसाठी अर्पण केले आणि कलाकारांना अखंडपणे साथ दिली. बरेचदा आमची थकबाकी असूनही ते आम्हाला नाटकासाठी सामान उपलब्ध करून देत असत. महानगरपालिकेने अण्णांचा योग्य वेळी सन्मान केला आहे.’ महानगरपालिकेने प्रायोगिक रंगमंचावरील नाटकांना वर्षातून एकदा सन्मानित करून, कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि सांस्कृतिक उपक्रम राबवताना कलाक्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले.