महसुलच्या जागेवर व्यावसायिकांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:40 PM2018-08-30T23:40:43+5:302018-08-30T23:41:21+5:30
दोन्ही विभागांचे दुर्लक्ष : बारामती-इंदापूर रस्त्यावरील पुलाचे कठडेही तोडले
सांगवी : बारामती-इंदापूर रस्त्यावर मोतीबाग येथे महसूल विभागाच्या जागेत अतिक्रमण करून व्यावसायीकानीं आपले व्यवसाय मांडले आहेत. तर या व्यवसायासाठी येणारे ग्राहक रस्त्यावर येत असल्याने वाहनांना याचा धोका आहे. याच कारणाने याच ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे महसुल जागेतील अतिक्रमणे तातडीने काढण्याची मागणी होऊ लागली आहे.
याचठिकाणी मागील आठवड्यात एक टेम्पो रात्रीच्यावेळी दुचाकीस्वार मध्ये आल्याने त्याला वाचवण्यासाठी मधील संरक्षण कथड्यावर जाऊन हा टेम्पो आदळा होता. या रस्त्यावर दिशादर्शल फलक बसवुन, गतिरोधक व्हावा, संरक्षण कठडे बसवुन अंधारात रेफ्लेक्टर बसवण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाला गेली सहा ते सात महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन ही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अधिकाऱ्यांकडून तक्रारींना केराची टोपली
अतिक्रमणाबाबत एखादा नागरिक तक्रार करण्यासाठी गेला असता. अधिकारी जागेवरूनच सबंधीत व्यावसायीकास फोनवरून अतिक्रमण काढण्याच्या विनवण्या करतात. मात्र अधिकारीवर्गाचे खिसे गरम होत असल्याने अशा तक्रारींना केराची टोपली दाखली जाते.
तर अतिक्रमणधारकांचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अनेक महिन्यांपासून गतिरोधक व संरक्षण कठडे बसविण्याची स्थानिक नागरिक निवेदन देण्यासाठी गेले असता सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र नागरिकांच्या मागणीला जाणीवपूर्वक तोंडी आश्वासन देऊन भूलथापा मारत आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाळाटाळ केली तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.