अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:19 PM2019-04-22T13:19:48+5:302019-04-22T13:24:59+5:30
विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे.
पुणे : अनुवादासाठी केवळ भाषिक अभिज्ञता (ज्ञान) उपयोगाची नसते, त्यासाठी भाषिक संवेदनशीलताही लागते. अनुवाद हे केवळ भाषांतरशास्त्र नाही, ती कला असते. मूळ लेखकाच्या निर्मितीतील वाचनीयता जपत शब्दांच्या खिडकीतून रस्ता मोकळा करावा लागतो. विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे. अनुभवाच्या देवघेवाणीचा अनुवाद ही उत्तुंग अनुभूती आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी अनुवादाचे शास्त्र उलगडले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले परिवारातर्फे रेखा ढोले स्मृती पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल करुणा गोखले यांना, सर्वोत्कृष्ट निर्मितीमुल्ये, मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीबद्दल राधिका टिपणीस यांना प्रदान करण्यात आला. ज्योत्स्ना प्रकाशनाला ‘बालाचा बेडुकमित्र आणि इतर’ या पुस्तकाचाही गौरव करण्यात आला. डॉ. ढेरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ए.जी.नुराणी लिखित ‘भगतसिंगचा खटला-न्यायाच्या हत्येचे कारस्थान’च्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. सदानंद बोरसे आणि रेखा ढोले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
करुणा गोखले म्हणाल्या, ‘माझ्या अनुवादक म्हणून घडण्यामध्ये राजहंसचा मोठा वाटा आहे. मराठीमधील साहित्य इतर भाषांमध्ये का जात नाही, असे विचारले जाते. अनुवादासाठी मातृभाषा जास्त जवळची वाटते. त्यातून अधिक सर्जनशीलतेने लिहिता येते. इंग्रजी माध्यमातून शिकणा-ाा मुलांना महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे वावडे नाही. त्यांना मराठी साहित्य श्राव्य स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास अनुवादाचे प्रमाण वाढेल. त्यासाठी लेखक, अनुवादक, प्रकाशक, विद्यापीठे अशा सर्वांनाच रस घ्यावा लागेल. सांघिक प्रयत्नातून अनुवादाला प्रोत्साहन मिळेल. बहुभाषिक संस्कृतीमध्ये सामूहिक प्रकल्प जास्त यशस्वी होऊ शकतात.’
मिलिंद परांजपे म्हणाले, ‘बालसाहित्य हा दुर्लक्षित राहिलेला प्रकार आहे. मुलांच्या पुस्तकांसाठी लेखन, चित्रे यांचा वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागतो. मराठीत मुलांसाठी नव्या रंगाढंगात आली पाहिजेत. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, उणीव आहे ती निर्मितीमूल्यांची. ती उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, रेखा ढोले यांचे पती प्रवीण ढोले, मैत्रीण सुषमा निसळ, डॉ. श्रीराम गीत आदी उपस्थित होते. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
..............
आपल्याकडे चित्रसाक्षरता खूप कमी आहे. भाषा शिकतो आणि ती येते, म्हणून वापरली जाते. मात्र, नृत्य, चित्रांकडे दुर्लक्ष होते. बालवाड्मय लिहिणे आणि प्रकाशित करणे सोपे वाटते. पण,क तोच सगळ्यात अवघड प्रकार आहे. जागतिक पातळीवर काय चालले आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे काम करणारे प्रकाशक फार कमी असतात. अनुवादामागे विशिष्ट वाड्मयीन दृष्टी असते.
- डॉ. अरुणा ढेरे