Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:33 PM2021-12-22T18:33:01+5:302021-12-22T18:35:06+5:30

तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्व झाले आहे

transplant surgery use a robot in hospital | Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर

Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर

Next

प्रज्ञा केळकर - सिंग

पुणे : तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्व झाले आहे. सांधे बदलांच्या शस्त्रक्रियेमध्ये रोबोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एकीकडे पुणे मेडिकल टुरिझमसाठी लोकप्रिय होत असताना रोबोटिक शस्त्रक्रियांसाठीही आता रुग्णांकडून पुण्याला पसंती दिली जात आहे. लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियांमध्येही रोबोचा वापर केला जातो.

जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांमध्ये सेकंड जनरेशन रोबोचा वापर केला जातो. हाडाला छिद्र पाडायचे असेल, सर्जनने ठरवलेल्या जागेत अचूकता आणायची असेल तर रोबोचा वापर केला जातो. सध्या गुडघा प्रत्यारोपण किंवा हिप रिप्लेसमेंटमध्ये रोबोचा उपयोग केला जातो. यासाठी दीड लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. पाच ते सात मिलिमिटरच्या छिद्रातून दुर्बिण सोडूनही रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते.

''पारंपरिक शस्त्रक्रियांमधील अनेक टप्पे रोबोटिक सर्जरीमध्ये टाळता येऊ शकतात. ज्युपिटर रुग्णालयामध्ये आता रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून, सुरुवातीच्या ५० शस्त्रक्रियांसाठी सामान्य गुडघा प्रत्यारोपणाइतकीच रक्कम आकारली जात आहे. रोबोच्या माध्यमातून वापरले जाणारे तंत्रज्ञान सर्जनला पूरक असते. आपल्या देशात अद्याप रोबो तयार करण्यात आलेला नाही. अमेरिका, युके, जर्मनी अशा देशांमधून रोबोची आयात केली जाते असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितले.''  

कसा दिसतो रोबो?

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘सांधेबदलाच्या शस्त्रक्रियांमध्ये वापरल्या जाणा-या रोबोचा आकार डायलिसिस मशीन किंवा एटीएम मशीनप्रमाणे असतो. मुख्य सेटअप, मॉनिटर आणि खालच्या बाजूला सीपीयूप्रमाणे यंत्रणा असते. रोबोटिक हँड ड्रिलची कनेक्टिव्हिटी कार्यान्वित केलेली असते. टेलीमॅनिप्युलेटर आणि यांत्रिक हात यांच्या समन्वयातून रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. रोबोटिक मशीनला परवाना मिळाल्यावर हिप रिप्लेसमेंटसाठीही रोबोचा वापर करता येऊ शकेल.

सततच्या असह्य वेदनांमुळे ५९ वर्षीय महिलेला गुडघा बदल शस्त्रक्रियेचा पर्याय निवडावा लागला. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांवर रोबोटिक आर्मच्या मदतीने गुडघाबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे गुडघेदुखीच्या रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे. रोबोटिक आर्म असिस्टेड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये, सिस्टीममधील सॉफ्टवेअर रुग्णाच्या सीटी स्कॅनवर आधारित सांध्याचे ३ डी मॉडेल तयार करते. सॉफ्टवेअर रुग्णाच्या परिस्थितीनुसार आभासी शस्त्रक्रिया योजना तयार करते. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच केलेले हे नियोजन सर्वात अचूक ठरते. रोबोटिक आर्म-असिस्टेड टेक्नॉलॉजीने रूग्णांना लवकर डिस्चार्ज देता येतो. पारंपारिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला  ५-६ दिवस मुक्काम करावा लागू शकतो. रोबोटिक आर्म-असिस्टेड टेक्नॉलॉजीमुळे अचूक नियोजन, हाडे आणि मऊ ऊतींचे संरक्षण, कमी वेदना, लवकर बरे होणे, जलद डिस्चार्ज आणि कमीप्रवाह हे फायदे आहेत असे सिनिअर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. मिलिंद पाटील म्हणाले आहेत.''  

कोणकोणत्या शस्त्रक्रियांमध्ये होतो रोबोचा वापर ?

- सांधेबदल किंवा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
-  प्रोस्टेट कर्करोग
- मूत्रपिंड शस्त्रक्रिया
- एंडोमेट्रिओसिस
-  लेप्रोस्कोपी

Web Title: transplant surgery use a robot in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.