Pune | खंडोबा यात्रेसाठी आकुर्डीतील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 08:29 PM2022-12-27T20:29:21+5:302022-12-27T20:31:33+5:30
माहीत करून घ्या वाहतुकीतील बदल...
पिंपरी :आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त बुधवारी (दि. २८) आणि गुरुवारी (दि. २९) आकुर्डी खंडोबामाळ चौक येथे वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथील खंडाेबामाळ चौकात खंडोबा मंदिर आहे. येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन लाखाे भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसराम गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केला आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :
- थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर, चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
- परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
- चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चोकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.
- टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.