‘वाहतूक सल्लागार’ उरली कागदावरच
By admin | Published: October 14, 2015 03:38 AM2015-10-14T03:38:04+5:302015-10-14T03:38:04+5:30
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे
पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. या समितीची शेवटची बैठक १३ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली होती. त्यानंतर पुढील बैठकीला मुहूर्तच मिळालेला नाही.
सततच्या वाहतूककोंडीमुळे पुणेकर हैराण झाले असताना, या समस्या सोडविण्यासाठी असलेले व्यासपीठच बंद असल्याने शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या आदेशानुसार, नेमण्यात आलेल्या या समितीच्या बैठका प्रत्येक तीन महिन्याला होणे आवश्यक असताना; दुसरीकडे प्रशासनाला या समितीचाच विसर पडला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शहरातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दरवर्षी तब्बल २ ते अडीच लाख नवीन वाहने रस्त्यावर येत येतात. त्यातच रस्ते अरुंद असल्याने सकाळी आणि सायंकाळी शहरात रस्त्याने चालणेही अवघड बनले आहे. त्याची दखल घेत, राज्य शासनाने शहरातील रिक्षा संघटना, पादचारी संघटनांचे प्रतिनिधी, पीएमपी, एस.टी., खासगी बस वाहतूक, मालवाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस, पालिका वाहतूक नियोजन विभाग यांची वाहतूक सल्लागार समिती नेमली होती. त्याच्या अध्यक्षपदी पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली होती. या समितीच्या नेमणुकीनंतर त्यांच्या नियमित बैठका होत होत्या. १३ आॅक्टोबर २०१३ नंतर गेल्या दोन वर्षांत या समितीची एकही बैठक झालेली नाही. विशेष म्हणजे ही बैठक घेण्याबाबत या संघटनांच्या प्रतिनिधींनी वारंवार पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही ती घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.