वाहतूक नियोजनाचा उडाला बोजवारा
By admin | Published: April 22, 2017 04:08 AM2017-04-22T04:08:31+5:302017-04-22T04:08:31+5:30
शहरातील वाहतुकीचे नियोजन, आराखडा तयार करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आदींची जबाबदारी असलेल्या महापालिका वाहतूक नियोजन विभागाच्या
- दीपक जाधव, पुणे
शहरातील वाहतुकीचे नियोजन, आराखडा तयार करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आदींची जबाबदारी असलेल्या महापालिका वाहतूक नियोजन विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे शहरातील वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. चुकलेले उड्डाणपूल, दुभाजकांची दुरवस्था, अतिक्रमणांमुळे चौकात तयार झालेले बॉटलनेक, सिग्नल व्यवस्थित न चालणे आदींमुळे वाहतूक समस्येने गेल्या काही वर्षांत अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाहतूक नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, ढिसाळ कारभार यामुळे रस्ते शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत़
शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. वाहनांच्या वाढलेल्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढली नाही. त्यामुळे पुणेकरांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे कोंडीत अधिक भर पडत आहे.
शहर वाढत असताना भविष्यातील वाहतूक समस्यांचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पालिकेकडून झाले नसल्याने या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पोलिसांना
अभियंता दिलाच नाही
वाहतूक पोलीस रस्त्यावर असलेल्या मर्यादित सोयी-सुविधांचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र वाहतुकीचे नियमन करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती वाहतूक पोलिसांना असत नाही. त्यामुळे खूप अडचणी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक विभागाला वाहतूक अभियंता (ट्रॅफिक इंजिनिअर) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सातत्याने केली आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सेवेत अनेक तज्ज्ञ अभियंते असताना त्यांना कारकुनी कामात गुंतवून ठेवले आहेत.
श्रीनिवास बोनाला यांच्या कारकिर्दीतच वाहतुकीचे वाजले बारा
महापालिकेमध्ये गेल्या २० वर्षांपासून श्रीनिवास बोनाला ट्रॅफिक प्लॅनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बढती मिळत आता ते मुख्य अभियंता (प्रकल्प) पदावर पोहोचले आहेत. मात्र, शहरातील वाहतुकीच्या नियोजनामध्ये बोनाला फारसे योगदान देऊ शकले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीतच शहराच्या वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. निष्क्रिय कारभारामुळे ते कायम वादग्रस्त राहिले आहेत. त्यांच्या कारभारावर पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी अनेकदा टीकेची झोड उठविली. काही सदस्यांनी तर बोनाला यांना पालिकेने काहीही काम न करता फुकट पगार द्यावा, पण त्यांच्याकडील वाहतूक नियोजनाची जबाबदारी काढून घ्यावी, अशी सूचना केली होती. मात्र बोनाला यांची नियुक्तीच ट्रफिक प्लॅनर म्हणून झाली असल्याने त्यांची प्रशासनाला दुसरीकडे बदलीही करता आली नाही. उलट सेवाज्येष्ठतेनुसार ते पालिकेच्या मुख्य अभियंतापदी (प्रकल्प) पोहोचले आहेत.
सल्लागारांवर कोट्यवधींचा खर्च, अधिकारी करतात आराम
महापालिकेच्या प्रकल्प विभागातील वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांना लाखो रुपयांचा पगार महापालिकेकडून दिला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या ज्ञानाचा पालिकेला काहीच उपयोग होताना दिसून येत नाही.
प्रकल्प विभागाकडून प्रत्येक कामासाठी सल्लागार कंपनी नेमली जाते. या सल्लागांराना कोट्यवधी रुपयांचे शुल्क पालिकेकडून दिले जाते.
पालिकेने बनविलेले उड्डाणपूल अथवा दुसऱ्या एखाद्या प्रकल्पात काही चूक झाल्यास ती जबाबदारी सल्लागारावर ढकलली जाते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ‘पगार मोठा मात्र काम काहीच नाही,’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- वाहतूककोंडीमध्ये सातत्याने अडकून पडावे लागणे, सिग्नलला खपूच जास्त वेळ थांबवे लागणे यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातून वाहतुकीचे नियम तोडण्याकडे कल वाढत आहे.
चौका-चौकांत बॉटलनेक
अतिक्रमणे व इतर काही कारणांमुळे शहरात अनेक ठिकाणी बॉटलनेक तयार होऊन वाहतूककोंडी होत आहे. वस्तूत: बॉटलनेक तयार होणार नाही किंवा झाले तरी ते दूर करण्याची जबाबदारी वाहतूक नियोजन विभागाची आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक नियोजन विभागाकडून काहीच प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
अनेक उड्डाणपुलांची बांधणी चुकीची
प्रचंड रहदारी असलेल्या शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्यात आले. मात्र त्यापैकी अनेक उड्डाणपुलाची बांधणी चुकल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलावरून औंध, बाणेर, पाषाणकडे जाण्याची सुविधा देण्यात आली. मात्र तिकडून शिवाजीनगरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात
आली नाही. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी कायम राहिली आहे. याच प्रकारे कर्वे रोड, हडपसर येथील उड्डाणपुलांची चुकीची
बांधणी झाली आहे.