आकर्षक वाहन क्रमांकातून परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयाची २७ कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 05:39 PM2017-12-12T17:39:57+5:302017-12-12T17:43:16+5:30
आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत.
पुणे : आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत. तर सात जणांनी सरासरी प्रत्येकी चार लाख रुपये दिले आहेत.
परिवहन विभागाकडून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी काही आकर्षक क्रमांक राखून ठेवले जातात. यामध्ये १, १००, ७८६, ४१४१ अशा विविध क्रमांकाचा समावेश असतो. प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) या क्रमांकासाठी अर्ज मागवून त्यानुसार लिलाव पध्दतीने हे क्रमांक संबंधित वाहनासाठी दिले जातात. त्यासाठी चार लाख रुपयांपर्यंत बोली लावता येवू शकते. मागील आर्थिक वर्षामध्ये पुणे विभागाला या लिलावातून तब्बल ३७ कोटी ३० लाख रुपयांची कमाई झाली होती. तर यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत विभागातून सुमारे ३६ हजार चालकांनी आकर्षक क्रमांक घेतला आहे. यातून २७ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे.
पुणे विभागांतर्गत आरटीओ पुणे, उप प्रादेशिक परिवहन कार्यलय सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि अकलुज या कार्यालयांचा समावेश होतो. वाहनांना आकर्षक क्रमांकासाठी सर्वाधिक पसंती पुणे कार्यालयाला दिली जाते. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक लागतो. एका क्रमांकासाठी चार लाख रुपये मोजणारे हौशी वाहनचालकही वाढू लागले आहेत. मागील आठ महिन्यांत सात चालकांनी सुमारे प्रत्येकी चार लाख रुपये मोजले आहेत. तर एक लाखांहून अधिक रक्कम मोजणाºयांची संख्या १२९ एवढी आहे. यातून पुणे विभागाला सुमारे २ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरटीओला यातून मिळणाºया उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्षातील अद्याप चार महिने बाकी असल्याने यंदा नवीन नोंदणीतून मिळणारे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.
आठ महिन्यांतील कार्यालय निहाय नोंदणी व उत्पन्न :
कार्यालय नोंदणी संख्या उत्पन्न
पुणे २१४८६ १५ कोटी ६९ लाख
सोलापूर २५९८ १ कोटी ७३ लाख
पिंपरी चिंचवड ९३९३ ७ कोटी ८६ लाख
बारामती २२८२ १ कोटी ७८ लाख
अकलुज २३४ १२ लाख
----------------------------------------------------------
एकूण ३५९९३ २७ कोटी १७ लाख
----------------------------------------------------------
शुल्कनिहाय वाहन नोंदणी
शुल्क नोंदणी
५ हजारापर्यंत २५६६०
५०००१ ते ७५०० ५४६९
७५०१ ते १०,००० ६२१
१०,००१ ते २०,००० १९११
२०,००१ ते ५०,००१ २१११
५०,००१ ते १,००००० ९२
१,००००१ ते २,५०,००० १२२
२,५०,००१ व त्यापुढे ७