रिक्षातून लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक; पोलीस तपासणीत दारूच्या बाटल्या जप्त
By नितीश गोवंडे | Published: May 5, 2024 03:46 PM2024-05-05T15:46:12+5:302024-05-05T15:46:30+5:30
पोलीस वाहनांची तपासणी करत असताना शनिवारी कात्रज चेकपोस्टवर रिक्षाच्या तपासणीत ही बाब आढळून आली
पुणे : अवैध पद्धतीने आर्थिक फायद्यासाठी रिक्षातून नेण्यात येणारे १ लाख १४ हजार ८०० रुपयांच्या बिअर, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (ता. ४) दुुपारी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मद्यासह एक रिक्षा असा २ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर हॉटेलचालक गणेश राजेंद्र डिंबळे (३५, रा. भिलारेवाडी) आणि रिक्षाचालक बिरूदेव बालाजी मुसळे (२५, रा. भिलारेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक बिरूदेव मुसळे हा त्याच्या रिक्षातून अवैध पद्धतीने मद्याची वाहतूक करताना पोलीस तपासणीत आढळून आला. यावेळी मद्यासह रिक्षात गणेश डिंबळे देखील होता. पोलीस वाहनांची तपासणी करत असताना शनिवारी कात्रज चेकपोस्टवर रिक्षाच्या तपासणीत ही बाब आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करत आहेत.