वाहतूककोंडीवर लवकरच तोडगा, पौड रस्त्यावर मेट्रोचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:30 AM2018-01-31T03:30:22+5:302018-01-31T03:33:32+5:30
पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कोथरूड : पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे दररोज परिसरात कोंडी होत आहे. परिणामी नागरिक त्यामुळे पुरते त्रस्त झाले आहेत. त्यावर काही तरी उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. त्यावर उपाय करण्यासाठी आज पाहणी करण्यात आली. पाहणी करताना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, भाजपाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, महामेट्रोचे चिफ प्रोजेक्ट मॅनेजर गौतम बिरहाडे, रितेश गर्ग, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीचे नामदेव गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप वेडे पाटील, स्थानिक नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, अल्पना वर्पे, किरण दगडे पाटील, डॉ. श्रद्धा प्रभुणे पाठक आदी उपस्थित होते.
कोंडीवरील उपाययोजना
१ एमआयटी शाळा चौक ते आयडियल कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या मधोमध मेट्रोच्या पिलरचे काम केले जाणार असून पिलरच्या दोन्ही बाजुने एकेरी वाहतूक सुरू ठेवणार.
२ वनाझ कंपनीकडून पौड फाट्याकडे जाताना कृष्णा हॉस्पिटलसमोर अजंठा अव्हेन्यूकडे जाणारा रस्त्याचा छेद प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात येणार असून नागरिकांना आयडियल कॉलनी चौक (आनंदनगर) येथून यू टर्न घेऊन अजंठा अव्हेन्यूकडे जाता येईल. दोन दिवसांनी आवश्यक बदल करून १० दिवस प्रायोगिक तत्त्वावर हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
३ प्रतीकनगर येथे असलेले म्हसोबा मंदिर हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र येथील नागरिकांशी चर्चा करून वाहतुकीस अडथळा ठरणारे हे मंदिर पर्यायी जागेत स्थालांतरित करण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली.
४ संपूर्ण पौड रस्ता हा नो
पार्किंग नो हॉल्टिंग झोन करण्याचा निर्णय.
५ महावितरणचे काही डीपी व विद्युत पोलही हलविण्यात येणार
६ शिवतीर्थनगर समोरील रस्ता
मात्र क्रॉसिंगसाठी खुला ठेवण्यात येणार. मात्र येथील पीएमपीचा थांबा स्थलांतरित करणे व दोन थांबे मागे पदपथावर हलविण्याबाबतही एकमत झाले.
७ वनाझ समोरील एसटी बसथांबा हलविणे व तेथील अनावश्यकरित्या उभारलेले ६ बस शेड काढून टाकण्याचा ही निर्णय घेण्यात आला.
८ अनेक ठिकाणी पदपथ लहान करणे व दुचाकी पार्किंगसाठी रँप करणेबाबत ही निर्णय.
९ तसेच संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक वॉर्डन नेमणे व सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.
१० सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून वडा /भजी /भेळ इ. विक्रीसाठी हातगाड्या उभ्या राहतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.
अवघ्या सहा महिन्यांत पौड रस्त्यावरील पिलर उभे राहतील, असा मेट्रोचा प्लॅन असून तोपर्यंत कोथरूडकरांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
- संदीप खर्डेकर
मेट्रोचे काम सुरू झाल्याने या भागात कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने आज पाहणी करण्यात आली. येत्या दहा दिवसांत उपाययोजनांवर काम करण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ,
अध्यक्ष, स्थायी समिती