वाहतूककोंडीने वैतागले पुणेकर
By admin | Published: July 29, 2014 03:25 AM2014-07-29T03:25:05+5:302014-07-29T03:25:05+5:30
सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे एरवी दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेकांनी आपल्या मोटारी बाहेर काढल्या़ बसने प्रवास करणाऱ्यांनी रिक्षाचा आसरा घेतला़
पुणे : सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे एरवी दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेकांनी आपल्या मोटारी बाहेर काढल्या़ बसने प्रवास करणाऱ्यांनी रिक्षाचा आसरा घेतला़, त्यामुळे पाऊस आणि आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामाला बाहेर पडलेल्या पुणेकरांना आज सकाळपासूनच ‘ट्रॅफिक जाम’चा अनुभव घ्यावा लागला़
शहरातील सर्व महत्त्वांच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे सकाळी १० वाजल्यापासूनच दिसून येत होते़ दुपारी काही वेळ वाहने कमी झाल्याने वाहतूककोंडी कमी झाली होती़ त्यानंतर पुन्हा सायंकाळी ४ नंतर कार्यालयातून घरी जाण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याने शहरातील सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले असल्याचे दिसून येत होते़ नेहमी २० ते २५ मिनिटे लागणाऱ्या अंतरासाठी आज दीड तास लागत होता.
औंध, बाणेरकडून येणाऱ्या वाहनांना पुणे विद्यापीठ चौकात नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो़ आज मात्र या चौकातील कोंडी वाहनचालकांची सहनशीलता पाहत होती़ दोन्ही रस्त्यांवर आज सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ चौकातील वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद करून शेवटी हाताने वाहतूक नियमन करून ही वाहतूककोंडी फोडण्याचा प्रयत्न केला; पण वाहनांची संख्याच इतकी प्रचंड होती, की त्यांचे प्रयत्न विफल ठरत होते़
नळस्टॉप चौक, सिमला आॅफिस, जेधे चौक, खंडोजीबाबा चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक असे शहरातील जवळपास सर्वच रस्ते वाहनांनी भरून वाहत होते़ पाऊस असल्याने वाहनांचा वेग कमी होता़ त्यात नेहमी दुचाकीने जाणाऱ्या अनेकांनी पावसामुळे मोटारी बाहेर काढल्या़, त्याचा परिणाम रस्त्यावरील मोटारींच्या संख्येत मोठी वाढ
झाली होती़ (प्रतिनिधी)