भिशीच्या फासात अडकवले! भामट्याने १६ लाख हडपले; संशयिताला अटक, महिलेवरही गुन्हा
By रोशन मोरे | Published: October 9, 2023 12:47 PM2023-10-09T12:47:28+5:302023-10-09T12:47:52+5:30
या प्रकरणी ॲड. गणेश रामभाऊ राऊत (वय ३४, रा. भोसरी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली....
पिंपरी : भिशीचा कालावधी संपल्यानंतर पैसे न देता तब्बल १६ लाख ३३ हजार ८०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना जानेवारी २०२१ ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्णानगर, चिखली येथे घडली. या प्रकरणी ॲड. गणेश रामभाऊ राऊत (वय ३४, रा. भोसरी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित संतोष रामदास बरबडे (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण, मोशी) याला अटक केली असून, एका संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित संतोष हा राजरत्न चिटफंड येथे संचालक आहे. त्याने आणि संशयित महिलेने संगनमत करून फिर्यादी गणेश राऊत आणि इतर साथीदारांची चिटफंडमधील भिशी योजनेत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक लाभांश देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी आणि त्या अन्य नागरिकांनी राजरत्न चिटफंडमधील भिशीमध्ये गुंतवणूक केली. भिशीची मुदत संपल्यानंतर लाभांशासह रक्कम देण्यास आरोपींनी टाळाटाळ करत १६ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा अपहार केला.