गैरव्यवस्थापनामुळेच कचरा प्रकल्प अडचणीत
By Admin | Published: March 29, 2017 02:51 AM2017-03-29T02:51:59+5:302017-03-29T02:51:59+5:30
महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १३ मोठे व २५ छोटे प्रकल्प खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिले आहेत
पुणे : महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १३ मोठे व २५ छोटे प्रकल्प खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिले आहेत. या कंपन्यांकडून करारातील तरतुदीनुसार शास्त्रीय पद्धतीने हे प्रकल्प चालविले जात नसल्याने प्रचंड दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रशाासनाकडून या प्रकल्पांवर योग्य ती देखरेख ठेवण्यात येत नसल्यामुळेच या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे.
बाणेर येथील कचरा प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे शहरातील एकंदरीतच कचरा प्रकल्पांचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरात तयार होणाऱ्या १५०० टन कचऱ्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे, तर उर्वरित ५०० टन कचरा हा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. प्रचंड दुर्गंधी व त्यातून निर्माण होणारे आरोग्यास घातक असणारे वायू यामुळे प्रकल्पांना नागरिकांचा विरोध होत आहे. वर्तक उद्यान व विश्रामबागवाडा येथील कचरा प्रकल्प नागरिकांच्या विरोधामुळे स्थलांतरित करावे लागले.
आरोग्य धोक्यात
बाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये १५० टन ओल्या कचऱ्यापासून त्याची मळी तयार केली जाते. ही मळी तळेगाव येथील प्रकल्पावर नेऊन त्यापासून सीएनजी गॅस तयार केला जात आहे.
कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करण्याचा अत्यंत अभिनव असा हा उपक्रम आहे. मात्र बाणेर येथे प्रकल्पात शास्त्रीय पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून दुर्गंधी व आरोग्यास हानिकारक वायू तयार होण्याची समस्या निर्माण होत आहे.
एक महिन्यात सुधारणा करण्याचे आश्वासन
बाणेर येथील कचरा प्रकल्पातून येणारी दुर्गंधी व इतर बाबींमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यानुसार या सुधारणा न झाल्यास त्याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल. आमचा कोणत्याही कचरा प्रकल्पाला विरोध नाही, तर कचरा प्रकल्प योग्य पद्धतीने चालविले जावेत, ही आमची मागणी आहे.
- मेधा कुलकर्णी, आमदार
दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना
बाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये ओला कचरा साठविला जात नाही. केवळ तो त्या प्रकल्पात करून त्याची सरी तळेगावला नेली जाते. तिथे दुर्गंधी होऊ नये, यासाठी पत्रे बसविणे व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. कचरा प्रकल्पांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रशासन आग्रही आहे.
- सुरेश जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख