कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By admin | Published: July 4, 2017 04:26 AM2017-07-04T04:26:25+5:302017-07-04T04:26:25+5:30
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून रामवाडी (हडपसर) येथे कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय म्हणून रामवाडी (हडपसर) येथे कचराप्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे, मात्र त्याला तीव्र विरोध सुरू असून, त्यासाठी परिसरातील भाजपा वगळता सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते एकत्र झाले आहेत. कचऱ्याची एकही गाडी इथे येऊ देणार नाही, असा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच योगेश ससाणे व अन्य नगरसेवकांनी याबाबत बोलताना सांगितले, की नागरिकांच्या आरोग्याचा काहीही विचार न करता, त्यांना विश्वासात न घेताच भाजपाने हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने येथे महापालिकेच्याच एका प्रकल्पाला मनाई केली आहे. त्यामुळे तो प्रकल्प बंद करावा लागला आहे. त्याचा विचार न करता आता पुन्हा दुसरा तसाच प्रकल्प माथी मारला जात आहे. शिवसेना नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनीही या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. शहरातला सगळा कचरा हडपसरमध्ये आणण्याचा चंगच महापालिकेने बांधला असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसनेही या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामटेकडी येथे महापालिकेची १३ एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेवर कचराप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने परवानगी दिली असल्यामुळे महापालिकेने तिथे ७०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया होईल असा प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. त्याचे भूमिपूजन
पुढील आठवड्यात होत आहे.
ते होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला
विरोध सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशी एकही
गोष्ट आम्ही करू देणार नाही,
असे ते म्हणाले.
शहरात दुसरीकडे जागा शोधावी
भाजपाचे स्थानिक नगरसेवक सत्तेमुळे मूग गिळून बसले असतील, मात्र आम्हाला आमच्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. फुरसुंगी, उरुळी यांचे काय झाले ते डोळ्यांसमोर आहे. एकदा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिका काहीही करणार नाही, आता त्यांच्या आश्वासनांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांनी शहरात दुसरीकडे कुठेही जागा शोधावी, तिथे प्रकल्प सुरू करावा, हडपसर परिसरात आता असे काहीही करू देणार नाही, असा निर्धार या पक्षांच्या नगरसेवकांनी व्यक्त केला.
शहरातील सर्व कचरा जमा करायचा व हडपसरमध्ये आणून टाकायचा हे आम्ही किती दिवस व का सहन करायचे? इथे चांगली विकासकामे केली जात नाहीत, जनहिताचे असे काहीही होत नाही. साध्या नागरी सुविधांही दिल्या जात नाहीत. आता मात्र असे चालणार नाही. कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प सुरू करू देणार नाही.
- चेतन तुपे,
विरोधी पक्षनेते, महापालिका