साध्या बसच्या दरात एसीचा प्रवास : सिध्दार्थ शिरोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 08:10 PM2018-05-04T20:10:37+5:302018-05-04T20:10:37+5:30
वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या तरी तिकीटांचे दर साध्या बसेसप्रमाणेच असणार आहेत.
पुणे : वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या तरी तिकीटांचे दर साध्या बसेसप्रमाणेच असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी दिली. तसेच पुढील चार वर्षांत प्रवासी संख्या २० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.
पीएमपीचे संचालक म्हणून वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त शिरोळे यांनी मागील वर्षभरातील कामे तसेच नवीन योजनांबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ५०० वातानुकूलित ई बसेसला मान्यता दिली आहे. या बसच्या निविदेप्रक्रियेबाबतची बैठक दि. ९ मे रोजी होणार आहे. पुढील दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. त्यानंतर दर महिन्याला किमान ५० बस मार्गावर येतील. या बस भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन असून सध्याच्या भाडेतत्वावरील बसेसच्या तुलनेत त्यांचा दर कमी असेल. ई-बसेससाठी केवळ जागा दिली जाईल. तिथे चार्जिंग पॉईंट असतील. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका तसेच स्मार्ट सिटीकडून यासाठी अनुदान मिळू शकते. तसेच पायाभुत सुविधाही संबंधित कंपनीच करणार आहे. त्यामुळे पीएमपीला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हा खर्च कमी झाल्याने बसेसचे तिकीट दर साध्या बसप्रमाणेच ठेवले जातील.
ई-बसप्रमाणेच ४०० सीएनजी बस घेण्याचेही प्रस्तावित आहे. या बस पीएमपीच खरेदी करणार आहे. दोन्ही बसेसची निविदा प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाईल. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ९३ बस आहेत. त्यातील २६० बस जुन्या असल्याने वर्षभरात स्कॅप कराव्या लागणार आहेत. तसेच त्यापुढील वर्षभरात १८० बस स्कॅप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात जुन्या ४४० बस कमी होतील. पुढील काही दिवसात ७० मिडी बस ताफ्यात येतील. त्याचवेळी टप्प्याटप्याने ई व सीएनजीच्या एकुण ९०० बस मिळणार आहेत. त्यामुळे दोन वर्षात एकुण बसेसची संख्या किमान अडीच हजार होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीअंतर्गत ई-रिक्षा
मुंबईतील एकात्मिक वाहतुक प्रकल्पाप्रमाणेच पुण्यातही मेट्रो व पीएमपीला जोडण्यात येईल. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत किमान एक हजार ई-रिक्षा खरेदी केल्या जाणार आहेत. या रिक्षा पीएमपीमार्फत चालविण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मेट्रो किंवा पीएमपीमधून उतरल्यानंतर लगेचच या रिक्षा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक वाहनांसाठी एकच स्मार्ट पास दिला जाईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.सिध्दार्थ शिरोळे म्हणाले...
- पीएमपीची प्रवासी संख्या चार वर्षात २० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट
- आस्थापना आराखडा लवकरच
- खासदार निधीतून बसस्थानकांच्या नुतनीकरणासाठी ३ कोटी उपलब्ध
- दैनंदिन पासचे दर ५० टक्क्यांनी कमी करणार
- नव्याने समाविष्ट १४ गावांचा वाहतुक नियोजन आराखडा तयार होणार
- पीएमपीचे सर्व आगार अत्याधुनिक करण्याचे नियोजन
- बस पार्किंगसाठी बोपोडी येथील जागा निश्चित