पुणे-मुंबई खासगी वाहनाने प्रवास महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:57+5:302021-09-27T04:10:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याहून मुंबईला जाताय तर तुम्हाला मुंबईवारी महागात पडेल. कारण, पुणे ते मुंबईदरम्यान सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याहून मुंबईला जाताय तर तुम्हाला मुंबईवारी महागात पडेल. कारण, पुणे ते मुंबईदरम्यान सेवा देणाऱ्या टॅक्सी, कॅबवाल्यांनी दर वाढविले. तेही थोडे थोडके नाही तर प्रतिप्रवासी १५० ते २०० रुपयांनी हा प्रवास महागला आहे. याचा थेट फटका पुणे ते मुंबई दरम्यान खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या जवळपास १५ हजारांहून अधिक प्रवाशांना बसणार आहे. परवानाधारक टॅक्सीसह बेकायदा वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालकांनीही भाडेवाढ केली आहे. त्यामुळे पुण्याहून खासगी वाहनाने मुंबईला जाणे महागात पडणार आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान रोज प्रवासी वाहतूक करणारे जवळपास आठ हजार खासगी वाहने धावतात. यातून किमान १५ ते २० हजार प्रवाशांची वाहतूक होते. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सेवा देणाऱ्या सर्वच खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याची शनिवारपासून अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे - मुंबई टॅक्सी सर्व्हिस, कूल कॅब व पुणे ते मुंबई विमानतळ सेवा देणाऱ्या खासगी कार तसेच बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी देखील भाडेवाढ केली.
बॉक्स १
टॅक्सी दर
नॉन एसी - ५५० (४००)
एसी - ६७५ (४७५)
मुंबई विमानतळ - नॉन एसी २४५० (२०५०)
मुंबई विमानतळ - एसी ५५०० (२३५०)
(कंसात जुने दर)
कोट : डिझेलच्या दरात वाढ झाल्याने पुणे-मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या कॅबचालकांनी दर वाढविले आहे. यात नॉन एसी व एसी दर्जाच्या टॅक्सीचा समावेश आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन, चालक प्रतिनिधी महासंघ.