परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:47 PM2020-04-10T16:47:22+5:302020-04-10T17:02:26+5:30
बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना लॉकडाऊनचा फटका..
पुणे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे.यामुळे संचारबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात आल्याने त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अडकून राहावे लागले आहे. कित्येकांना पुन्हा आपआपल्या गावी परतायचे आहे. परंतु पोलिसांनी अटकाव केल्याने ते शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. यावर पोलिसांनी आता जे नागरिक परराज्यात अथवा दुसऱ्या शहरात अडकले आहेत त्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी त्यांनी दिलेले कारण पोलिसांनी योग्य ठरवणे गरजेचे आहे.
पुणे पोलिसांनी आता अति आवश्यक कारणामुळे परराज्यात प्रवास करता येणार आहे. अशी माहिती दिली आहे. यासाठी संबंधित नागरिकांनी covid19mpass@gmail.com या मेल आयडीवर विनंती अर्ज पाठविण्याची सूचना केली आहे. याशिवाय अधिक माहिती मिळवण्यासाठी 022-22021680 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांनी ज्याठिकाणी आहे तिथे राहण्याचे आवाहन केले असताना काही नागरिकांनी अक्षरश: हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना मोठया समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता पोलिसानी मेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक दिल्याने त्यांना थोडा फार दिलासा मिळणार आहे. पुणे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना महाराष्ट्रातून प्रवास करायचा आहे त्यांना योग्य कारण असल्यास परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेसाठी पुणे पोलिसांकडून शहरातील अंतर्गत प्रवासासाठी डिजिटल पास वितरित करण्यात आले आहेत. हा पास मिळवून तो पोलिसांना दाखवल्यास शहरात प्रवास करता येणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.