Pune: ‘पीएमपी’ने प्रवास करा अन् माेफत अंघाेळीचा लाभ घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:40 PM2022-07-17T14:40:31+5:302022-07-17T14:42:06+5:30
प्रवाशांना प्रशासनाकडून फक्त मानसिक त्रासच सहन करावा लागत असल्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे
पुणे : शहरात सर्वत्र माॅन्सून सेल भरले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)नेही यात उडी घेतली आहे. त्यांच्याकडून ‘पीएमपी’ने प्रवास करा अन् माेफत अंघाेळीचा लाभ घ्या’ अशी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माउथ पब्लिसिटी प्रवाशांकडून केली जात आहे.
पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रशासनाकडून फक्त मानसिक त्रासच सहन करावा लागत असल्याचे चित्र यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे. पुण्यातील असंख्य ठिकाणी पीएमपीचे बसथांबेच नसल्याने प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही. त्यावर राेष व्यक्त करताना पुणेकरांसाठी पीएमपीकडून माेफत अंघोळीची सोय करण्यात आल्याचे प्रवासी सांगत आहेत.
पीएमपीने बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) १५०० बसथांबे उभारण्याच्या निविदा दोन वेळा काढल्या होत्या. त्यानंतरही बस थांबा उभारण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पुणेकरांना सध्या पावसात चिंब भिजावे लागत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; त्यानंतरही कोणतीही सुविधा उभारण्यात आलेली नाही. पुणे शहरात पीएमपीचे चार हजारांहून अधिक बसथांबे आहेत. त्यांपैकी बहुतांश ठिकाणी फक्त पाट्या असून बसथांबा नावालाच आहे.
झाडपडी अन् विजेचाही धाेका
उन्हाळ्यात पीएमपी प्रवासी उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आसरा घेतात. पावसाळ्यात मात्र झाडाखाली थांबणे धोक्याचे ठरू शकते. झाड उन्मळून पडणे अथवा वीज पडण्यासारखे प्रकार पावसाळ्यात होऊ शकतात. त्यामुळे प्रवासी झाडाखाली थांबण्यापेक्षा पावसात भिजणेच पसंत करतात. प्रशासनातर्फे तातडीने बसथांबे उभारले जावेत, अशी मागणीही पुणेकर करीत आहेत.
पीएमपीची प्रतिदिन सद्य:स्थिती
- सरासरी उत्पन्न - १ कोटीपेक्षा अधिक
- पीएमपी बस - २ हजार
- सरासरी प्रवासी - १० लाख
- २ हजार बसचा कि.मी. प्रवास - तीन लाख
- बसच्या फेऱ्या - २० हजार
- बसथांबे - चार हजारांपेक्षा जास्त