महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा : ६६ तेजस्विनी बस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 09:14 PM2019-02-09T21:14:43+5:302019-02-09T21:15:01+5:30
तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : दररोज बसने प्रवास करणाºया महिला प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मार्गावर ३३ बस धावत असून त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटी रुपये अनुदानातून पीएमपी प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी ३३ मिडी बस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी सहा बस व २५ इलेक्ट्रिक बसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. मागील वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त पीएमपीने तेजस्विनी बस सुरू केल्या आहेत. यावेळी ताफ्यात नव्याने आलेल्या ३३ मिडी बस त्यासाठी वापरण्यात येत आहेत. तेजस्विनी बससाठी राज्य शासनाने दिलेल्या अनुदानातून ३३ बस खरेदीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यातील ६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरीत बसही फेब्रुवारी अखेरपर्यंत येतील.
याविषयी बोलताना पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे म्हणाल्या, तेजस्विनी बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन तेजस्विनी बस येणार असल्या तरी यापुर्वी मार्गावर असलेल्या बसही सुरू ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे एकुण बसची संख्या ६६ होणार आहे. तसेच या बस आरामदायी असून महिलांचा आणखी प्रतिसाद वाढेल. केवळ महिलांसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस दिल्या जाणार आहेत. नवीन बस चालविण्यासाठी सोप्या आहेत. त्यामुळे भविष्यात या बसवर महिला चालक देण्याबाबत विचार केला जाईल.
------------
ई-बस धावणार मंगळवारपासून
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी ई-बसचे लोकार्पण झाले असले तरी या बस मंगळवारी प्रत्यक्ष मार्गावर येणार आहेत. सध्या केवळ १० बसची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून या दहा बसचे सातपैकी काही मार्गांसाठी नियोजन केले जाईल. उर्वरीत बस नोंदणी झाल्यानंतर टप्प्याटप्याने मार्गावर सोडल्या जातील. या बसचा तिकीट दर इतर बसप्रमाणेच ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे नयना गुंडे यांनी सांगितले.
--------