तान्हुल्यासोबत महिला टाळतात प्रवास
By admin | Published: March 15, 2016 03:50 AM2016-03-15T03:50:34+5:302016-03-15T03:50:34+5:30
वल्लभनगर बसस्थानकामध्ये सुरू असलेला हिरकणी कक्ष सध्या कुलूप बंद आहे. पण महिला तान्हुल्या बाळाला घेऊन प्रवास करीत नाहीत किंवा त्यांच्यासोबत दुधाच्या बाटल्या असतात.
पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकामध्ये सुरू असलेला हिरकणी कक्ष सध्या कुलूप बंद आहे. पण महिला तान्हुल्या बाळाला घेऊन प्रवास करीत नाहीत किंवा त्यांच्यासोबत दुधाच्या बाटल्या असतात. त्यामुळे या कक्षाचा कोणीच वापर करत नाही, असा जावईशोध एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. पण या ठिकाणी असुरक्षितचे वातावरण असल्याने महिला त्याचा वापर करत नसल्याचे सत्य दडविण्याचा प्रयत्न केला.
राज्य शासनाने महिला प्रवाशांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) वतीने राज्यभर असलेल्या बसस्थानकांत हिरकणी कक्ष असणे आवश्यक आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थानकात असलेला हिरकणी कक्ष बंद आहे. एसटी प्रशासनाचे अधिकारी प्रतिसाद कमी असल्याचे सांगत आहेत.
तान्ह्या बाळांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना बाळाला दूध पाजण्यासाठी बाहेरगावी प्रवास करणे जिकिरीचे ठरते. फक्त आई आणि बाळ यांची सोय व्हावी, या कारणाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. परिसरातील नेहमी वर्दळीचे असलेले, तसेच मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वल्लभनगर बसस्थानकात जून २०१३मध्ये हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आली. तसेच, सदर बसस्थानकात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. महिलांना कळून यावे, यासाठी जनजागृती फलक लावलेले आहेत. सद्य:स्थितीत कुलूपबंद असलेल्या या हिरकणी कक्षाकडे महिला फिरकत नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडलेल्या होत्या. तसेच या ठिकाणी टवाळखोरांचा वावर असतो. (प्रतिनिधी)
हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली असली, तरी
महिलांचा प्रतिसाद कमी आहे. अलीकडे तान्ह्या बाळांना घेऊन प्रवास करणे महिला टाळतात, नाही तर दुधाची बाटली सोबत बाळगतात. सुरक्षेच्या दृष्टीने तसेच गैरवापर टाळण्यासाठी हिरकणी कक्ष बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे बंद स्थितीत असलेला हिरकणी कक्ष मागणी केल्यास उपलब्ध केला जातो.- अनिल भिसे, आगारप्रमुख, वल्लभनगर बसस्थानक