हडपसर ते उरुळी कांचन प्रवास करताय? सावधान..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:33 AM2019-01-06T00:33:57+5:302019-01-06T00:34:18+5:30
सायंकाळी ६ नंतर जबरदस्त वाहतूककोंडी : पोलीस प्रशासनाची भूमिका ठरणार महत्त्वाची
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान सायंकाळी ६ नंतर चारचाकी वाहनाने किंवा अन्य मोठ्या वाहनाने प्रवास करीत असाल, तर तयारी ठेवा दोन ते तीन तास रस्त्यातील वाहतूककोंडीत अडकून पडण्याची! या महामार्गावरील मंगल कार्यालयांंत लग्नसराईच्या धूमधडाक्याने सायंकाळी ५ ते ६ नंतर प्रचंड प्रमाणात ह्यकृत्रिमह्ण वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त होऊन गेले आहेत .
या दरम्यान प्रवास करताना जादा वेळेचे नियोजन करून प्रवासाचे अंतिम ठिकाणी पोहोचण्याचे नियोजन करणे झाले आहे गरजेचे. पुणे ग्रामीण व शहर पोलीस तासन् तास महामार्ग तुंबून वाहतूककोंडीची घुसमट काढण्यास अपयशी ठरल्याने या महामार्गवर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
पुणे - सोलापूर महामार्गावरील ह्यपंचतारांकितह्ण मंगल कार्यालयांत लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे. या ठिकाणच्या प्रतिष्ठितांच्या लग्नसोहळ्यांमुळे व त्यांच्याकडे येणाऱ्या शाही पाहुण्यांमुळे हडपसर ते उरुळी कांचनपर्यंतदरम्यानचा रस्ता या मंडळींच्या वाहनांसाठीचा वाहनतळ बनला आहे. या वाहनांच्या आक्राळविक्राळ पार्किंगने वाहतुककोंडीचा मोठा त्रास सर्वसामान्य जनतेला, पांढरपेशा नोकरवर्गाला सातत्याने अनुभवावा लागत आहे, या बेशिस्त वाहतुकीचा बोजा रस्तांवर पडल्याने प्रचंड वाहतूककोडींची समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर या महामार्गावरील मंगलकार्यालयातील लग्नसमारंभानिमित्त फटाक्यांचे बार उडू लागल्यावर तर या ठिकाणी वाहतूककोंडी बघायलाच नको.
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान २० किलोमीटर महामार्गावर अनेक मोठी मंगलकार्यालये आहेत. या कार्यालयात होणारे लग्नसभारंभ, साखरपुडे ,टिळे, वाढदिवस आदी कार्यक्रम प्रचंड थाटामाटात होत असल्याने या कार्यालयांचे मालक व यजमानांचे आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी यांना सार्वजनिक वाहतूककोंडीचे काहीच सोयरसुतक राहिलेले दिसत नाही. ते आपल्या तालात मश्गुल होऊन नाचत असतात, तर जनता नाखुशीने ताटकळत वाहतूककोंडीत उभी असते.
महामार्गावरील १५ नंबर, शेवाळेवाडी, कवडीपाट, लोणी स्टेशन, थेऊर फाटा, उरुळी कांचनपर्यंतची या ठिकाणच्या वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. परिणामी चारपदरी असलेला हा महामार्ग वाहतुकीला तोकडा पडू लागला आहे. सायंकाळी उद्भवणाºया या परिस्थितीने या दरम्यान प्रवास करणाºया प्रवासी, नोकरदार वगार्ला प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. तासन् तास हा रस्ता वाहतुकीने चक्काजाम होऊ लागल्याने काही मिनिटांचा या दरम्यानचा प्रवास काही तासांचा बनला आहे.
हडपसर ते कवडीपाट टोलनाका ही हद्द शहर पोलिसांकडे तर कवडीपाट ते उरुळी कांचन हद्द ग्रामीण पोलिसांकडे आहे. परंतु या नित्याच्या वाहतूककोंडीवर वाहतूक पोलिसांना अजून तरी या वाहतूककोंडीची समस्या सुटणे मुश्कील झाले आहे. या वाहतुकीवर व बेशिस्तपणावर कठोर कारवाई होत नसल्याने निर्ढावलेली जनता वाहतूककोंडीची समस्या तीव्र करीत आहे.
बेशिस्त वाहतूक व मंगलकार्यालयांवर ठोस कारवाई होत नसल्याने वाहतुकीची समस्या भविष्यात अधिकच वाढणार
आहे हे नक्की!