साध्या बसच्या दरात एसीचा प्रवास - सिद्धार्थ शिरोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:12 AM2018-05-05T04:12:32+5:302018-05-05T04:12:32+5:30
वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या, तरी तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
पुणे - वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या, तरी तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. तसेच, पुढील चार वर्षांत प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.
पीएमपीचे संचालक म्हणून वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शिरोळे यांनी मागील वर्षभरातील कामे तसेच
नवीन योजनांबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी ५०० वातानुकूलित ई-बसना मान्यता दिली आहे. या बसच्या निविदा प्रक्रियेबाबतची बैठक दि. ९ मे रोजी होणार आहे.
पुढील २ महिन्यांत
निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दर महिन्याला किमान ५० बस मार्गावर येतील.
या बस भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन असून सध्याच्या भाडेतत्त्वावरील बसच्या तुलनेत त्यांचा दर कमी असेल. ई-बससाठी केवळ जागा दिली जाईल.
तिथे चार्जिंग पॉर्इंट असतील.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच स्मार्ट सिटीकडून यासाठी अनुदान मिळू शकते.
पायाभूत सुविधाही संबंधित कंपनीच करणार आहे. त्यामुळे पीएमपीला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हा खर्च कमी झाल्याने बसचे तिकीट दर साध्या बसप्रमाणेच ठेवले जातील.
ई-बसप्रमाणेच ४०० सीएनजी बस घेण्याचेही प्रस्तावित आहे. या बस पीएमपीच खरेदी करणार आहे.
दोन्ही बसची निविदा प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाईल. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ९३ बस आहेत. त्यांतील २६० बस जुन्या असल्याने वर्षभरात स्क्रॅप कराव्या लागणार आहेत.
तसेच, त्यापुढील वर्षभरात १८० बस स्कॅ्रप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत जुन्या ४४० बस कमी होतील.
पुढील काही दिवसांत ७० मिडीबस ताफ्यात येतील. त्याच वेळी टप्प्याटप्याने ई व सीएनजीच्या एकूण ९०० बस मिळणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांत एकूण बसची संख्या किमान अडीच हजार होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीअंतर्गत ई-रिक्षा
मुंबईतील एकात्मिक वाहतूक प्रकल्पाप्रमाणेच पुण्यातही मेट्रो व पीएमपी यांना जोडण्यात येईल. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत किमान एक हजार ई-रिक्षा खरेदी केल्या जाणार आहेत. या रिक्षा पीएमपीमार्फत चालविण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मेट्रो किंवा पीएमपीमधून उतरल्यानंतर लगेचच या रिक्षा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक वाहनांसाठी एकच स्मार्ट पास दिला जाईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.
४पीएमपीची प्रवासीसंख्या चार वर्षांत २० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट, आस्थापना आराखडा लवकरच.
४खासदार निधीतून बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी ३ कोटी उपलब्ध
४दैनंदिन पासचे दर ५० टक्क्यांनी कमी करणार. नव्याने समाविष्ट १४ गावांचा वाहतूक नियोजन आराखडा तयार, पीएमपीची सर्व आगार अत्याधुनिक करणार. बस पार्किंगसाठी बोपोडी येथील जागा निश्चित