एसटीने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:40+5:302021-06-05T04:08:40+5:30
डमी स्टार 775 लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर लाल परीने धावण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ...
डमी स्टार 775
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर लाल परीने धावण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून काही प्रमाणात एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनीदेखील सुखावले आहेत. रिकाम्या एसटी आता १० ते १५ प्रवासी प्रवास करीत आहे. दीड महिन्यापासून शुकशुकाट असलेल्या बसस्थानकावर आता प्रवाशांची लगबग दिसत आहे.
ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शासनाच्या आदेशामुळे अद्यापही एसटी सेवेवर निर्बंध कायम आहेत. त्यामुळे गाड्या पूर्ण क्षमतेने न धावता प्रवासी संख्या लक्षात घेऊन धावत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वाहतुकीस मंजुरी असल्याने प्रवासी संख्या मर्यादित आहे. स्वारगेट, वाकडेवाडी व पुणे स्टेशन बसस्थानकांवर रोज येणाऱ्या गाड्याच्या संख्येत दोन दिवसांत वाढ झाली आहे.
----------------------
पुणे विभागात एकूण बस : १०००
सध्या सुरू असलेल्या : ८०
एकूण कर्मचारी : ४५००
वाहक : १६००
चालक : १८००
एकूण कामावर असलेले चालक : ३००
कामावर असलेले वाहक : १५०
-----------
सर्वाधिक बसेस मुंबईसाठी :
पुणे स्टेशन बसस्थानकवरून २२ तर, स्वारगेट बसस्थानकावरून १५ बसेस मुंबईला जात आहेत. शिवाय सोलापूर, कोल्हापूर, सातारा आदी शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांना आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सर्वाधिक प्रतिसाद मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना लाभत आहे. इंद्रायणी, प्रगती व डेक्कन क्वीन ह्या प्रमुख रेल्वे सध्या बंद असल्याने मुंबईला जाणारे प्रवासी एसटीने मुबंई गाठत आहेत.
-------------------
बस सॅनिटायझर होते तर कधी नाही :
प्रत्येक ट्रिप वेळेस बस सॅनिटायझर करून सोडावी असे आदेश महामंडळाने दिले. मात्र, कधी बस सॅनिटायझ होते तर कधी नाही. प्रवासी मास्क लावून बसतात; मात्र ते आपली सीट सॅनिटायझ करून घेत नाही.
--------------------------
दीड महिन्यात ३४ कोटींचा फटका
पुणे विभागाला रोजचे प्रवासी उत्पन्न हे जवळपास ७५ लाख रुपये होते. ते या दीड महिन्यांत बुडाले. त्यामुळे पुणे विभागाला जवळपास ३४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
---------------------------
प्रवासी घरातच
दोन दिवसांपासून एसटी सेवा सुरू झाली असली तरीही अनेक प्रवासी घरात राहणेच पसंत करत आहे. ग्रामीण भागातून तसेच अन्य शहरातून पुण्यात येणाऱ्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. पुण्याहून बाहेर पडणाऱ्याचे प्रमाण कमी आहे.