विद्यार्थ्यांचा प्रवास होतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:21 AM2017-08-14T00:21:10+5:302017-08-14T00:21:18+5:30
पाल्याला वेळेत आणि सुरक्षित शाळेत पोहचता यावे, म्हणून बरेचसे पालक खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करीत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : पाल्याला वेळेत आणि सुरक्षित शाळेत पोहचता यावे, म्हणून बरेचसे पालक खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करीत असतात. काही पालक मुलांना शाळेच्या बसमध्ये पाठवत असतात. यासाठी शाळा किंवा खासगी वर्दी बजावणारे चालक त्यासाठी पालकांकडून प्रवास भाडे घेत असतात. परंतु सदर विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. बरेचसे विद्यार्थी नियमितपणे संपूर्ण प्रवासात उभे राहून असतात.
रिक्षामध्ये तर आठ ते दहा विद्यार्थी दाटीवाटीने बसलेले, काही विद्यार्थी उभे असतात. बरेचसे पालक आळीपाळीने विद्यार्थी शाळेत सोडविणे आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी पार पडतात. यासाठी दुचाकीवर तीन ते चार विद्यार्थी दाटीवाटीने बसवून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करीत असतात. अशा पद्धतीने चिमुकल्यांची वाहतूक करीत असताना यामध्ये मोठा धोका असल्याचेही भान राहत नाही. अशा बेशिस्त वाहनांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार?
शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या फाटकाबाहेर बस, रिक्षा आणि पालकांची चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी मोठ्या उत्साहाने घोळक्या घोळक्याने बाहेर पडत असतात. यामुळे शाळा सुटल्यानंतर फाटकाबाहेरील आवारात आणि रस्त्यावर रोजच वाहतूककोंडी होत असते. सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी याच गर्दीतून मार्ग काढत असतात.
बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येत भर
निगडी : भक्तीशक्ती चौक व (कै.) मधुकर पवळे उड्डाणपूल येथील चौकात दुपारच्या सत्रात वाहतूक पोलीस सिग्नलवर उपलब्ध नसतात. या दोन्ही सिग्नलवर वाहतूककोंडी व बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येत भर पडते. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना मात्र आपला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे दुपारी शाळा भरण्याच्या वेळेमध्ये वाहतूक पोलीस या चौकात उपस्थित असतील, तर वाहतूककोंडी व किरकोळ अपघातासारख्या घटना घडणार नाहीत, वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.विद्यार्थ्यांच्या मनस्वास्थ्यावर याचा परिणाम होणार असल्यामुळे अभ्यासातील प्रगतीवरही अनिष्ट परिणाम होत असल्याचे मानशास्त्रीय विश्लेषकांचे मत आहे. याचा विचार शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांनी करावा.
चिमुकल्यांची कसरत
जाधववाडी : सर्व शाळा जवळ असल्याने पायी चालणाºया विद्यार्थ्यांची संख्या आधिक आहे . काही पालक आपल्या दुचाकीवर तीन किंवा तीनपेक्षा अधिक मुले धोकादायक पद्धतीने घेऊन जाताना शाळा परिसरात दिसली. तसेच जाधववाडी-मोशी शिव रस्ता येथेदेखील दुतर्फा फेरीवाले बसत असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांच्या बसना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रिक्षावाले, दुचाक्या, इतर वाहने प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी बसवून शाळेपर्यंत पोहोचवतात. या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जाधववाडीतील अनेक शाळांमध्ये परिवहन समित्या नाहीत. परिवहनाबाबत कोणतीही नियमावली नाही. शाळा परिसरात नो पार्किंग, नो हॉर्न, नो स्टॉप अशा कसल्याही प्रकारच्या सूचना लावलेले फलक दिसत नाहीत. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पालकांची व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे पायी चालणारा विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बिचारा वाट शोधीत शाळेत कसाबसा प्रवेश करीत असतो.
शाळेसाठी बालचमूंचा जीव धोक्यात
पिंपळे गुरव : सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरामध्ये स्कूल बस, रिक्षा व दुचाकी वाहनांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होत आहे. दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी असताना तीन-तीन, चार-चार मुलांना दुचाकीवर बसवून धोकादायक प्रवास पालकांकडून केला जात आहे. बहुतांश स्कूल बसमध्ये मुलांसाठी सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून येत आहे.
जास्त पैसे मिळविण्याच्या हेतूने रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून रिक्षा भरधाव दामटल्या जातात. मुलांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. सर्वसामान्य विद्यार्थी सायकलवर प्रवास करतात. वाहतूककोंडी असलेल्या चौकांमध्ये मात्र त्यांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व गोष्टींकडे कोणत्याही प्रशासनाचा धाक नाही. त्यामुळे पालक, स्कूल बस, रिक्षा सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
खडकी : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया रिक्षा, टेम्पो, मिनी बस हे आरटीओने दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवून एका रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच २० ते २५ विद्यार्थी कोंबून महामार्गावरून जात असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. याकडे खडकी वाहतूक पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. या रिक्षा-टेम्पोचालकांकडून पोलिसांना मलिदा मिळत असल्यामुळे या चालकांचे फावले आहे.
खडकीतील बºयाच शाळांसमोर असा प्रकार पाहावयास मिळत आहे. पालकवर्गही बिनधास्तपणे अशा रिक्षांमधून मुलांना पाठवत आहे. अनेक रिक्षा-टेम्पोना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरटीओच्या नियमाप्रमाणे संरक्षक जाळी, साइड बार, रिफ्लेक्टर तसेच टेम्पो-बसमध्ये विद्यार्थ्यांना चढउतार करण्यासाठी मदतनीस असणे गरजेचे आहे. विद्यार्थी स्वत: किंवा पालकांनाच गाडीत सोडावे लागते.