ताम्हिणी घाटातील प्रवास होणार सुखकर
By admin | Published: May 7, 2017 03:13 AM2017-05-07T03:13:37+5:302017-05-07T03:13:37+5:30
पुणेकरांना कोकणाशी व कोकणाला पुण्याशी जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून ओळख असलेला पुणे-महाड हा राज्यमार्ग. आता
लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : पुणेकरांना कोकणाशी व कोकणाला पुण्याशी जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून ओळख असलेला पुणे-महाड हा राज्यमार्ग. आता या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. त्याला ७५३ एफ हा क्रमांक देण्यात आला असून, वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करण्यात येणार आहे. या भागात पडणाऱ्या कमाल पावसाचा विचार करून संपूर्ण रस्ता सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. वाढत्या रहदारीचा विचार करून रुंदीकरण होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पौड बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड म्हणाले, की पुढील काळात हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा व ७ मीटर रुंदीचा होणार आहे.
दोन्ही बाजूने दीड दीड मीटर डांबरी साईडपट्ट्या करण्यात येणार असून त्यामुळे एकूण १० मीटर रुंदीचा होणार आहे. त्यामुळे भविष्यात छोट्या चारचाकी, दुचाकी वाहनांबारोबरच पुणे ते रोहा एमआयडीसी असा प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांचाही प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
याशिवाय भूगाव, पौड या ठिकाणच्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही प्रशासन स्तरावर लवकरच मार्गी लागणार असल्याने या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी संपणार आहे. नवीन रुंदीकरणाचे काम होत असताना या वळण रस्त्याचेही पुरेसे रुंदीकरण व्हावे, ही अपेक्षा माजी जि.प. सदस्य सुभाष अमराळे यांनी व्यक्त केली.
चांदणी चौकात आवश्यक उड्डाणपुलाची निर्मिती करून येथील वाहतूक समस्या लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास वाटतो. महानगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या व उड्डाणपूल कामाच्या खर्चातील साधारणत: ४५० ते ५०० कोटींचा खर्च महानगरपालिका उचलणार असल्याने येथील काम
लवकरच मार्गी लागेल, असे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी सांगितले.
सध्या हा रस्ता पुणे ते पौडपर्यंत सात मीटर रुंद आहे. पुढे मुळशी ते महाडपर्यंत हा रस्ता साडेपाच मीटरच रुंद असल्याने वाहतुकीला अडचण होते. विशेषत: अवजड वाहतुकीला पावसाळ्यात मोठी अडचण मिर्माण होते.
अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर सातत्याने लहान मोठे अपघात घडतच असतात. सध्या दररोज किमान एक ते दोन असे लहान मोठे अपघात घडण्याचे प्रमाण आहे. ही समस्या टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे महत्वाचे आहे.