"गद्दारी आमच्याबरोबर केली पण हीच शेतकऱ्यांबरोबर करू नका" - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:52 PM2022-10-28T12:52:00+5:302022-10-28T12:54:51+5:30
पुण्यात माजी मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे अतिवृष्टी पाहणी दौरा
पुणे : राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. अतिवृष्टी पाहणी दौरा अंतर्गत शेतकरी संवाद आणि शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. त्यानिमित्त पुण्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावाला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. यावेळी गावातील शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे गाव शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतं. 'अस्मानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या साथीला, बांधावरच्या भेटीला!' या ब्रीदवाक्य सह या दौऱ्यात ठाकरे यांच्या शेतकऱ्यांशी भेटी सुरू आहेत. अंबादास दानवे आणि सचिन अहिर यांचीही दौऱ्याला ठाकरे यांच्यासोबत उपस्थिती होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी खाली बसून संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, इथे अतिवृष्टी झाल्यानंतर तुमच्या शेताचे पंचनामे झालेत की नाही? शेतकऱ्यांना हा पहिला प्रश्न करत संवादाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी एकही पंचनामा झाला नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी हीच परिस्थिती आम्हाला या घटनाबाह्य सरकारकडे घेऊन जायची असल्याचे सांगितले. तसेच गद्दारी आमच्यासोबत केली पण हीच गद्दारी या माझ्या शेतकऱ्यांबरोबर करू नका असेही त्यांनी सरकारला सांगितले.